“हे भगवान! आता तुला देखील तुझे पैसे परत मिळवण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार” अशा आशयाचे ट्विट करुन अभिनेता प्रकाश राज यांनी येस बँकेवर निशाणा साधला आहे. नव्या पिढीची आधुनिक खासगी बँक म्हणून नावाजल्या गेलेल्या येस बँकेवर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला आहे.

पर्याप्त प्रमाणात भांडवलाचा अभाव, आधीच्या व्यवस्थापनाकडून झालेला गैरकारभार, नियमबाह्य कर्जवाटपाचे पर्यवसान म्हणून बुडीत कर्जाचा वाढत गेलेला डोंगर अशी संकटे बँकेपुढे आहेत. त्यातच आता केंद्रातील सरकारने, रिझर्व्ह बँकेच्या साथीने बँकेवर निर्बंध आणले. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा रातोरात निर्णय झाला आणि येस बँक खातेदारांना त्यांच्या खात्यातून केवळ ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल, अशी मर्यादा घालण्यात आली. परिणामी जग्गनाथ पुरी देवस्थानाचे तब्बल ५४५ कोटी रुपये येस बँकेत अडकले आहेत. दरम्यान या सर्व प्रकारावर प्रकाश राज यांनी आपल्या नेहमीच्याच अंदाजात जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले प्रकाश राज?

“हे भगवान!… तुम्हाला देखील रांगेत उभे केले. भक्तांनो पाहा, जग्गनाथ पुरी देवस्थानाचे ५४५ कोटी येस बँकेत आहेत. तुम्हाला याची चिंता व्हायला हवी.” अशा आशयाचे ट्विट प्रकाश राज यांनी केले आहे.

प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणारा विविध घडामोडिंवर ते आपली मते रोखठोकपणे मांडतात. अनेकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.