महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहिला जातो. रोजच्या ताणतणावाच्या आयुष्यात हास्याची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. यंदा दिवाळीनिमित्त महाराष्ट्राची हास्यजत्राह्णच्या मंचावर पाहुणे म्हणून अभिनेते प्रशांत दामले खास उपस्थित होते. अभिनेते प्रशांत दामले आजपर्यंत वेगवेगळे नाटक, चित्रपट यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. त्यांच्या नाटकांचे १२,५०० प्रयोग पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांसोबत स्कीट करण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. हास्यजत्रेचे चित्रीकरण हा तसा किचकट भाग असतो. चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी तालमी करणं गरजेचं असतं. प्रशांत दामले त्यांच्या अत्यंत व्यग्र अशा वेळापत्रकातून वेळ काढून तालमीला हजर राहिले. त्यांनी तब्बल चार ते पाच तास ते सलग सगळय़ा कलावंतांबरोबर सराव करत तालमीचा मजेशीर अनुभव घेतला.

या स्कीटमध्ये त्यांच्याबरोबर प्राजक्ता माळी, समीर चौगुले, शिवाजी परब, ओंकार राऊत आणि चेतना भट यांनी देखील सहभाग घेतला आहे. चित्रीकरणाच्या दिवशीसुद्धा इतर कलावंतांसारखं माझे कपडे कुठले असतील? माझा प्रवेश कधी होणार आहे? प्रवेशाच्या वेळेला कोणी काय करायचं? ए जास्त एडिशन घ्यायचे नाही, व्यवस्थित सुटसुटीत साचेबद्ध पण तडाखेबाज करू या.. असा सूचनावजा सल्ला देत प्रशांत दामले यांनी हास्यजत्रेच्या रंगमंचावरती एन्ट्री घेतली आणि हास्याचा आणि टाळय़ांचा कडकडाट झाला. अगदी पहिल्या सेकंदापासून स्कीटच्या शेवटच्या सेकंदापर्यंत त्या टाळय़ा थांबल्याच नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या मंचावर प्रशांत दामले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दिवाळीनिमित्त हा प्रशांत दामले विशेष भाग सोमवारी, २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता प्रेक्षकांना ‘सोनी मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.