बॉलिवूड चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडल्यावर अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा मोर्चा सध्या हॉलिवूडपटांकडे वळवला आहे. सध्या प्रियांका तिच्या ‘क्वांटिको २’ या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. यासोबतच ती लवकरच ‘बेवॉच’ या चित्रपटातही झळकणार आहे. अभिनय क्षेत्रात अनेकांच्याच मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरलेल्या या अभिनेत्रीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला घेतला आहे. युनिसेफतर्फे प्रियांकाची ग्लोबल अॅम्बेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
‘क्वांटिको २’ या मालिकेला मिळालेल्या प्रसिद्धीकडे पाहता तिच्या नावाभोवती असणारी चाहत्यांची गर्दी ही काही नवी बाब नाही. प्रियांकाच्या वाट्याला आलेली ही बाब अतिशय प्रशंसनीय असून सोशल मीडियावरही तिचे कौतुक करण्यात येत आहे. खुद्द प्रियांकानेसुद्धा तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. जागतिक स्तरावर बालक्कांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘फॉर एव्हरी चाइल्ड’या उपक्रमाअंतर्गत प्रियांका काम करणार आहे. त्यामुळे ही भूमिका देसी गर्ल कितपत वठवते याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित ‘बेवॉच’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गेल्या बर्याच महिन्यांपासून चर्चा सुरू होती. प्रियांकाला पाहण्यासाठी तिचे चाहतेही खूप उत्सुक होते. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बेवॉच’ हॉलिवूडपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांका अवघ्या काही सेकंदांसाठी दिसली आहे. त्यामुळे हा ट्रेलर प्रियांकाच्या चाहत्यांची निराशा करणारा असा आहे.
पुढच्या वर्षी २६ मे २०१७ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘बेवॉच’ हा चित्रपट, याच नावाच्या गाजलेल्या टीव्ही मालिकेवर आधारित आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूड चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. ड्वेन जॉन्सन ‘द रॉक’ मुख भूमिकेत असून झॅक एफ्रॉन, अलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रियांका खलनायिकेची भूमिका साकारत असून तिचे हॅलोविन स्वरूपातील पोस्टर यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र सध्या समोर आलेल्या ट्रेलरमध्ये तिची झलक काही सेंकदापूर्ती दिसल्याने ‘पिक्चर अभी बाकी है…’ हा डायलॉगच देसी गर्लच्या चाहत्यांना दिलासा देणारा ठरेल.