जगभरातल्या सौंदर्य स्पर्धांपैकी सगळ्यात महत्त्वाची सौंदर्य स्पर्धा म्हणजे मिस वर्ल्ड. आतापर्यंत ऐश्वर्या राय-बच्चन, डायना हेडन, मानुषी छिल्लर आणि प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींनी ही स्पर्धा जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यामध्येच अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला असून २००० मध्ये प्रियांकाने मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर तिच्या आईची पहिली प्रतिक्रिया नेमकी कशी होती हे तिने सांगितलं आहे.
अलिकडेच प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिच्या भावाच्या म्हणजेच सिद्धार्थ चोप्रा आणि आई मधू चोप्रा यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
“प्रियांकाने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर मला आनंदाश्रू अनावर झाले होते. मी तिला कडकडून मिठी मारली आणि पहिलाच प्रश्न विचारला बाळा आता तुझ्या पुढील शिक्षणाचं काय? खरंतर आता हा मुर्खपणा वाटतोय, पण त्यावेळी मला काहीच सुचत नव्हतं”, असं प्रियांकाच्या आईने सांगितलं.
दरम्यान, मिस वर्ल्ड किताब पटकावणारी प्रियांका बॉलिवूडसह हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून लवकरच तिचा द व्हाइट टायगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.