‘मल्टिलेव्हल मार्केटिंग’ क्षेत्रातील क्यूनेट कंपनीकडून झालेल्या ४२५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अभिनेता बोमन इराणी यांचा मुलगा दानेश याचा काय संबंध आहे, याचा तपास आता पोलीसांकडून सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये दानेश याला बऱयापैकी रक्कम मिळाली असल्याचे तपासात आढळल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
गुरप्रित सिंग आनंद याने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘क्यूनेट’ विरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. गुरप्रित सिंग आनंद याने बुधवारी मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांची भेट घेऊन त्यांच्याकडे दानेश याच्याविरोधातही दोन पानी तक्रार दाखल केली. यामध्ये दानेशचा या सर्व प्रकरणाशी कसा संबंध आहे, याची माहिती देण्यात आली आहे.
दानेशने आपल्या वडिलांबरोबर या योजनेचा प्रचार आणि प्रसिद्धी केल्याचे त्याने आपल्या लेखी तक्रारीमध्ये म्हटले आहे. असे असले तरी अभिनेता बोमन इराणी या प्रकरणाचा हिस्सा नसल्याचे पोलिसांना वाटत आहे. याविषयी बोलताना अतिरिक्त पोलिस आयुक्त (आर्थिक गुन्हे) राजवर्धन सिन्हा म्हणाले, ‘क्यूनेट’ प्रकरणात बोमन इराणी याची कोणतीही भूमिका नाही. त्याचा मुलगा दानेशने ‘क्यूनेट’द्वारे बऱ्यापैकी रक्कम मिळवली असून, या प्रकरणातील त्याच्या भूमिकेचा आम्ही छडा लावत आहोत.
पुढील कारवाईसाठी पोलिस दानेशच्या बॅंक खात्यांची पडताळणी करणार आहे. या ‘मल्टिलेव्हल मार्केटिंग’ योजनेत बोमन इराणी आणि माजी ‘बिलियर्डस् चॅम्पियन’ मायकेलचा सहभाग असल्याचा आरोप गुरप्रितने केला आहे. बोमन आणि मायकेलसारख्या व्यक्तींचा यात सहभाग असल्याने अनेकजण या योजनेकडे आकर्षित झाले. त्यामुळे या प्रकरणात ते सुद्धा दोषी असून, या कारणास्तव त्यांचे हे कृत्य लोकांसमोर आणल्याचे गुरप्रितने सांगितले. दानेशच्या ‘क्यूनेट’ सभासदस्यत्वाचे सर्व तपशील या प्रकरणाच्या शोधकर्त्यांना दिले असल्याचा दावा त्याने केला आहे. दानेशच्या खात्यात १८ कोटी रूपयांचा व्यवहार झाल्याचे दिसत असून, या ‘मल्टिलेव्हल मार्केटिंग’ योजनेत त्याला बऱ्यापैकी मोबदला मिळाल्याचे दिसून येत असल्याचे गुरुप्रितचे म्हणणे आहे.
याप्रकरणी पोलीसांनी चौकशीला बोलावूनसुद्धा न आल्याबद्दल फरेरा, क्यूनटेचे संस्थापक विजय इश्वरन आणि त्यांच्या तीन सहकाऱयांविरोधात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मॅग्नेटीक डिस्क, हर्बल उत्पादने आणि हॉलिडे स्किम्ससारख्या फसव्या योजना विकून गुंतवणूकदारांना लुबाडल्याप्रकरणी पोलिसांनी ‘क्यूनेट’च्या नऊ गटप्रमुखांना आधीच अटक केली आहे.