‘मसान’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता विकी कौशलने या कलाविश्वात स्वत:चा असा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. ‘राजी’ आणि ‘संजू’ या चित्रपटातील भूमिकांनंतर त्याच्या चाहत्यांच्या आकड्यात झपाट्याने वाढ झाली आहे. विकीच्या चाहत्यांच्या आकड्यात तरुणींची संख्या तुलनेने जास्त आहे. असं असलं तरीही त्याच्या तमाम चाहत्यांसाठी आता एक वाईट बातमी आहे.

कारण, तरुणींच्या मनाचा ठाव घेणारा विकी सध्या एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. कामासोबतच विकीच्या खासगी आयुष्यातही सध्या सुरेख काळ सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री, सुत्रसंचालिका हरलीन सेठी हिच्यासोबतच्या नात्यामुळे या चर्चा रंगत आहेत.

विविध जाहीरातींमधून झळकलेली हरलीन येत्या काळात विक्रांत मेसीसोबत ‘ब्रोकन’ या वेब सीरिजमधूनही सर्वांच्या भेटीला आली होती. पण, तिच्या या वेब सीरिजपेक्षा आता जास्त उधाण आलं आहे ते म्हणजे विकीसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांना.

वाचा : #WeWantSacredGames2 : ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनसाठी नेटकरी आतूर

एका वेब पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एका मित्रामुळे या दोघांची ओळख झाली होती. काही महिन्यांपूर्वीच ते एकमेकांना भेटले असून, अगदी हळुवारपणे त्यांच्यातील हे नातं उलगडत आहे. मुळात नात्यातील या काळाचा सध्या दोघंही आनंद घेत असल्याचं कळत आहे. अशा या नात्याविषयी आता आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.