‘जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रोडक्शन्स’ची निर्मिती असलेला ‘राझी’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हायवे सिनेमानंतर पुन्हा एकदा आलिया भट्टचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मेघना गुलझार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. काश्मिरी महिला गुप्तहेर एका पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याशी लग्न करुन पाकिस्तानातून अनेक महत्त्वपूर्ण बातम्या भारताला पाठवते. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. असे असमान्य काम करणारी महिला होती तरी कोण याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

रिपोर्ट्सनुसार हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर राझी सिनेमाची कथा बेतलेली आहे. १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या वातावरणात सहमत एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करते. पण हरिंदर यांनी ही कथा लिहिताना सहमतच्या घरातल्यांबद्दल फार कळू नये याची खबरदारी घेतली आहे. सहमत एक काश्मिरी मुस्लिम मुलगी होती. तिला गुप्तहेरीबद्दल काहीही माहीत नव्हते.

सहमतचे वडील हे कट्टर देशभक्त होते. १९७१ भारत- पाकिस्तान युद्धाच्या काळात अशा एका गुप्तहेराची गरज होती जो पाकिस्तानी लष्करामध्ये राहून तिथल्या बातम्या भारताला देऊ शकेल. सहमतचे वडील तिला पाकिस्तानला पाठवायला तयार होतात. पण सहमतला हेरगिरीबद्दल काहीच कल्पना नसतेत्यामुळे भारतीय लष्करी अधिकारीही तिला पाकिस्तानात न पाठवण्याचा सल्ला देतात. पण तरीही सहमतचे वडील आपल्या निर्णयावर ठाम असतात आणि मुलीला भारताचा डोळा आणि कान बनवून पाकिस्तानात पाठवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहमत पाकिस्तानात पोहचून भारतासाठी तिथल्या सर्व गुप्त गोष्टी शोधून काढते. सहमतच्या नवऱ्याची भूमिका विक्की कौशलने वठवली आहे. असे म्हटले जाते की, सहमतमुळेच १९७१ मधील युद्धात अनेक भारतीय सैनिकांचे प्राण वाचले होते. मोहिम पूर्ण झाल्यानंतर ती महिला तिच्या मुलासह भारतात परत आली. तिचा मुलगाही नंतर भारतीय सेनेत होता. त्याने कारगिल युद्धही लढले. तो कदाचित अजूनही सेनेत आहे असे म्हटले जाते. पण ती महिला गुप्तहेर मात्र मरण पावली. सहमत देशाची सेवा करणाऱ्या त्या लोकांपैकी एक आहे ज्यांनी पडद्याआड राहून देशाच्या रक्षणात अतुलनीय योगदान दिले.