हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते, ज्यांनी आपल्या अद्वितीय,अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ संगीतकार म्हणजे ‘डॉ. वसंतराव देशपांडे’. त्यांनी बंदिश, ठुमरी, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत या सर्व गान प्रकारांवर आपल्या गायकीचा अमीट ठसा उमटवला. डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘मी वसंतराव’ हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘धप्पा’चे दिग्दर्शक आणि ‘भाडिपा’फेम निपुण धर्माधिकारी या बायोपिकचं दिग्दर्शन करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून गायक राहुल देशपांडे यांचा अभिनय प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे. राहुल देशपांडे हे वसंतराव देशपांडे यांचे नातू आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये राहुल, वसंतराव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे राहुल यांना त्यांच्याच आजोबांची भूमिका वठविण्याची संधी मिळणार आहे.
प्रदर्शित झालेल्या टीझरमधून वसंतराव पाहायला मिळत आहेत. यामध्ये त्यांचे विचार, संगीतावरचं प्रेम आणि प्रत्येकवेळी घेतलेली खंबीर भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे टीझरमध्ये वसंतरावांच्या भूमिकेत झळकलेले राहुल हुबेहूब वसंतरावांप्रमाणे भासत आहेत.
दरम्यान, “राहुल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची माहिती देत, लवकरच माझं आणि निपुणचं स्वप्न पूर्ण होणार आहे”, असं म्हटलं. या चित्रपटात अभिनेत्री अनिता दाते, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर,कौमुदी वालोकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.