‘आशिकी’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारा अभिनेता राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. सध्या नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आता राहुलच्या प्रकृतीविषयी त्याच्या मेहुण्याने माहिती दिली आहे.

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राहुलच्या मेहुण्याने, रोमीर सेनने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. गोळ्या औषधे काम करत आहेत पण तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करा असे त्याने म्हटले आहे. ‘आम्ही राहुल दादासोबत आहोत आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधांचा त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी मदत होत आहे. तो लवकरच बरा होईल. पण तुम्ही सगळ्यांनी तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करा’ असे रोमीर म्हणाला.

राहुल रॉय त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली होती. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचारांनाही तो योग्य प्रतिसाद देत असल्याचे म्हटले जात आहे.

राहुल रॉयने १९९० मध्ये आशिकी या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्या चित्रपटानंतर राहुल रॉयला मोठी ओळखही मिळाली. त्यानंतर राहुलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याने जवळपास ४७ चित्रपट साईन केले. परंतु हळूहळू राहुल रॉय लाईमलाईटपासून दूर होत गेला. आता LAC- Live the Battle या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सध्या चित्रपटाच्या चित्रीकरण थांबण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.