नयनरम्यस्थळी चित्रीत करण्यात आलेली चित्रपटातील दृश्ये मोठ्या पडद्यावर अनुभवणे डोळ्यांना सुखावणारे असते. काही स्थळे तर स्वप्नरंजित भासतात आणि ही प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा मोह अनावर होतो. ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या मिर्झिया या राकेश ओमप्रकाश मेहरांच्या चित्रपटातदेखील याची अनुभूती प्रेक्षकांना येणार आहे. आत्तापर्यंत कधीही पाहण्यात न आलेल्या प्रेक्षणीय ठिकाणांवर त्यांनी चित्रपटाचे शुटिंग केले आहे. मिर्झिया चित्रपटातील दृश्ये अनोख्या ठिकाणी चित्रीत व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी सहकाऱ्यांसोबत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. पाकिस्तान सीमेपासून १७ किलोमीटरवरील थूलिया येथील नैसर्गिक साजाने मढलेल्या स्वप्नरंजित भासणाऱ्या स्थळाची त्यांनी निवड केली. यावरूनच त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा अंदाज येतो. चित्रपटाचा प्रोमो पाहतानादेखील त्यातील नयनरम्य दृश्ये डोळ्यांना सुखावणारी वाटतात. चित्रपटाचा सर्वाधिक भाग लडाख आणि राजस्थानमध्ये शूट झाला असला, तरी यात नवेपणा आणि ताजेपणा आणण्यासाठी दिग्दर्शकाने सर्वोतोपरी प्रयत्न केलेले आहेत. थूलिया येथील चित्रीकरणासाठी राकेश ओमप्रकाश मेहरा यांना बीएसएफ आणि आईबीकडून विशेष परवानगी घ्यावी लागली होती. एवढेच नव्हे, तर शूटिंगसाठी त्यांना रोज ९० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे. राजस्थान आणि लडाखमध्ये नवीन स्थळांच्या शोधासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम राबवली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लडाखच्या नौबारापासून पहलगामपर्यंत आणि राजस्थानच्या उदयपूरमधील शिव निवास पॅलेस ते फतेहगढ पॅलेसपर्यंत मेहरा यांनी अनेक जागांना भेटी दिल्या. मिर्जा साहिबान यांच्या लोककथांना आपल्या शैलीत साकारताना आम्ही लडाख आणि दूरवरच्या ठिकाणांचा दौरा केला. तिथे अनोख्या जागा सापडल्या. चीनच्या सीमेजवळील प्रेक्षणीय स्थळांसाठी भारतीय सेनेने आमची मदत केली. चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट करताना जैसलमेर, फुलिया आणि बाडमेरपासून खूप दूर वाळवंटात पोहचल्याचा अनुभव त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगची आठवण सांगताना कथन केला. येथे सामान्य नागरिकांस प्रवेशबंदी असल्याने स्थानिक पर्यटन मंडळ आणि सेनेने खूप मदत केल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakeysh omprakash mehra revealed about the shooting of mirzya
First published on: 27-09-2016 at 12:04 IST