आज ७ ऑगस्टला देशभरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहाने सादरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी भावाची रक्षा व्हावी म्हणून त्याला राखी बांधतात. भारतात असा एकही सण नसेल ज्याला बॉलिवूडमध्ये एखादं गाणं नाही. त्यात रक्षाबंधन हा सण म्हटल्यावर बॉलिवूडमध्ये तर या सणाची अनेक प्रसिद्ध आणि अंतर्मुख करणारी गाणी ऐकायला मिळतील. चला तर मग बॉलिवूडमधील याच काही प्रसिद्ध गाण्यांना नव्याने उजाळा देऊ…
शाहरुखने फ्रेंडशिप डेच्या दिवशी असा पाळला आमिरचा शब्द
१. मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन…
१९६५ मध्ये राम माहेश्वरी दिग्दर्शित ‘काजल’ या सिनेमातलं हे सुप्रसिद्ध गाणं. या गाण्यात भावा- बहिणीचं अनोखं नातं दाखवण्यात आलं आहे. साहिर लुधियान्वी यांनी हे गाणे लिहिले असून रवी यांनी त्याला संगीत दिले आहे. मीना कुमारी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याला आशा भोसले यांचा सुरेख आवाज लाभला आहे. या गाण्यात मीना कुमारी आपल्या भावाला हे गाणं गाऊन त्याच्यासाठीचं प्रेम व्यक्त करते.
२. भैया मेरे राखी के बंधन को निभाना
अभिनेते बलराज साहनी आणि नंदा यांच्यावर चित्रीत झालेले हे गाणे १९७१ मध्ये आलेल्या ‘छोटी बहन’ या सिनेमातले आहे. हे गाणे रक्षाबंधन सणावरच चित्रीत करण्यात आले. यात नंदा आपल्या भावाला म्हणजे बलराज साहनी यांना राखी बांधताना हे गीत म्हणतात. शंकर जयकिशन यांनी या गाण्याला संगीत दिले असून शैलेंद्र यांनी हे गाणे लिहिले आहे. तर लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले आहे.
३. फुलों का तारों का सबका कहना है
१९७१ मध्ये आलेला ‘हरे रामा हरे कृष्णा’ या सिनेमातलं हे गाणं आजही तितकच प्रसिद्ध आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आजही कित्येकदा ऐकायला मिळतं. देव आनंद झिनत अमान यांच्यावर चित्रीत झालेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन देव आनंद यांनीच केले होते.
४. बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है…
१९७४ मध्ये आलेल्या ‘रेशम की डोरी’ या सिनेमात धर्मेंद्र यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं आजही हिट आहे. शैलेंद्र यांनी लिहिलेल्या या गीताला शंकर- जयकिशन यांनी संगीत दिलं होतं तर सुमन कल्याणपुर यांचा आवाज गाण्याला लाभला होता.
५. ये राखी बंधन है ऐसा
१९७२ मध्ये आलेल्या ‘बेईमान’ या सिनेमातले रक्षाबंधनचे तेव्हाचे सुपरहिट गाणे होते. शंकर- जयकिशन यांचे संगीत असलेले हे हाणे लता मंगेशकर यांनीच गायले होते. मनोज कुमार, राखी, प्राण, स्नेह लता आणि प्रेमनाथ यांच्या मुख्य भूमिका होत्या.