दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिकेत नुकताच रावणाच्या वधाचा एपिसोड पार पडला. या लोकप्रिय मालिकेला पुन्हा एकदा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यात रावणाची नकारात्मक भूमिका असूनही त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळत आहे. रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल व रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचा एक दुर्मिळ फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या दोघांच्या ऑफस्क्रीन मैत्रीचं चित्रण या फोटोत सहज दिसून येतंय.

या फोटोमध्ये दोघंही राम व रावणाच्या वेशभूषेत पाहायला मिळत आहेत. हे दोघं हस्तांदोलन करताना हा फोटो काढला गेला आहे. फोटोमधील दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य सर्वकाही सांगून जात आहे. शूटिंगदरम्यान सर्व कलाकार एका कुटुंबाप्रमाणेच राहत होते, असं अरुण गोविल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अरविंद त्रिवेदी यांनी २५० हून अधिक गुजराती चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ते नेहमी वेळेवर तयार होत असत आणि एका टेकमध्ये शूटिंग पूर्ण करत असत. जेव्हा त्यांना समजलं की रामानंद सागर हे रामायण मालिकेची निर्मिती करत आहेत, तेव्हा ते गुजरातहून मुंबईला आले होते. मात्र त्यांना मालिकेत रावणाची नव्हे तर केवटाची भूमिका साकारायची इच्छा होती.