अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या ट्रेलरने अनेकांचेच लक्ष वेधले होते. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वाजणाऱ्या पार्श्वसंगीताने त्यात चार चाँद लावले होते असेच म्हणावे लागेल. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे ‘जग्गा जासूस’च्या निमित्ताने नव्या प्रकारच्या संगीताचा नजराणा प्रेक्षकांना मिळणार असे अनेकांनाच वाटत होते. याबाबतच चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळणाऱ्या संगीतकार प्रितमने ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात तब्बल २९ गाणी असल्याचा खुलासा केला आहे.
चित्रपटामध्ये २९ गाणी असल्याचे सांगताना प्रितम म्हणाला की या चित्रपटामध्ये रणबीर गाण्याच्या माध्यमातून त्याच्या भावना व्यक्त करताना दिसणार आहे. चित्रपटातील गाणी कथानकाचाच एक महत्त्वाचा भाग आहेत. रणबीर या चित्रपटामध्ये अडखळत बोलणारे एक पात्र साकारणार आहे, जो फक्त गाण्याच्या माध्यमातूनच न अडखळता बोलू शकतो. त्यामुळे ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने कतरिना कैफसुद्धा बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यातही रणबीर आणि तिची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. ‘जग्गा जासूस’च्या ट्रेलरमधील कतरिनाच्या लूकवरही अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. ट्रेलरमधील काही दृश्ये पाहता रणबीर आणि अनुरागच्या ‘बर्फी’ या चित्रपटाची आठवण अनेकांनाच झाली होती. ‘जग्गा जासूस’ चित्रपट कौटुंबिक मनोरंजनासाठी परिपूर्ण असा असल्याचे म्हटले जातेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जग्गा जासूस’च्या आयुष्यातील काही मजेशीर क्षण आणि थरार चित्रपटात पाहता येणार आहेत.
अनुराग बासू सोबत रणबीरचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्याने अनुरागच्या ‘बर्फी’ या चित्रपटामध्ये काम केले होते. ‘जग्गा जासूस’ नंतर अभिनेता रणबीर कपूर आणि अनुराग बासू प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या जीवनावर बनणाऱ्या एका चित्रपटासाठीदेखील एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामागोमाग रणबीर अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर बनणाऱ्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी सध्या तो फार मेहनत घेत असल्याची माहितीसुद्धा सुत्रांनी दिली आहे.