रणवीर सिंह आणि दिपिका पादुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘८३’ हा चित्रपट मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या या चित्रपटाचं प्रमोशन भारत आणि भारताबाहेरही जोरदार सुरू आहे. भारतानं १९८३ साली मिळवलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सध्या रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईला गेले असून तिथे झालेल्या प्रमोशनच्या एका कार्यक्रमात दीपिकानं चक्क रणवीरच्या कपड्यांची खिल्ली उडवली.
सोशल मीडयावर रणवीर- दीपिकाच्या या दुबई प्रमोशनचे बरेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. नेहमीच आपल्या हटके आउटफिट्समुळे चर्चेत राहणाऱ्या रणवीरनं या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अशाच हटके लूकला पसंती दिली होती. यावेळी तो सोनेरी रंगाचा टी-शर्ट आणि पॅन्ट अशा अवतारात दिसला. त्याचा हा रेट्रो लूक सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. पण त्याची पत्नी दीपिकानं मात्र त्याच्या या लूकची खिल्ली उडवली.
प्रमोशन कार्यक्रमात रणवीरच्या कपड्यांबद्दल बोलताना दीपिका म्हणाली, ‘तुझे कपडे तर या माइकसोबत मॅच होत आहेत.’ दीपिकानं रणवीरच्या कपड्यांची तुलना माइकशी केली. मात्र रणवीरचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या या लूकचं कौतुक करताना दिसत आहेत. रणवीरची मुख्य भूमिका असलेला ‘८३’ हा चित्रपट येत्या २४ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खाननं केलं असून यात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.