‘यश राज फिल्म्स’च्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अभिनेता रणवीर सिंग लवकरच या बॅनरअंतर्गत आणखी एका चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘जयेशभाई जोरदार’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये रणवीर एका गुजराती व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मनिष शर्मा करणार असून दिव्यांग ठक्कर याचं दिग्दर्शन करणार आहे. दिग्दर्शक म्हणून दिव्यांगचा हा पहिलाच चित्रपट आहे.

हा कॉमेडी चित्रपट असेल. ड्रामा, पिरिअड ड्रामा, रोमान्स, खलनायकी अशा विविध प्रकारांनंतर रणवीर आता कॉमेडी भूमिकेत झळकणार आहे. रणवीरने आतापर्यंत ‘यश राज फिल्म्स’च्या बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. ‘किल दिल’, ‘बेफीक्रे’, ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’, ‘गुंडे’ या चित्रपटांमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली आहे.

ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. सध्या रणवीर आगामी ‘८३’ चित्रपटाचं चित्रीकरण करतोय. ते संपल्यावर लगेचच ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.