Ranya Rao Gold Smuggling: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या रावला सोनं तस्करी प्रकरणात एक वर्ष कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. रान्या रावला मार्च महिन्यात सोनं तस्करी प्रकरणात बंगळुरु विमानतळावर अटक करण्यात आली होती.
नेमकं काय प्रकरण घडलं?
रान्या रावने मागच्या वर्षभरात गल्फ देशांमधल्या १० तरी फेऱ्या केल्या. तसंच फेब्रुवारी-मार्च महिन्यात ती चार वेळा दुबईला जाऊन आली. त्यामुळे ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. रान्या राववर पोलिसांना संशय आलाच होता. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली. रान्या ५ मार्चला जेव्हा दुबईहून बंगळुरुला पोहचली तेव्हा तिला पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी थांबवलं. तिच्या झडतीत पोलिसांना सगळं घबाड सापडलं. एक पोलीस कॉन्स्टेबल तिला विमानतळातून बाहेर पडण्यासाठी मदत करायचा. एवढंच नाही तर जतीन हुक्केरी हा रान्याचा पती आहे. तो प्रतिथयश आर्किटेक्ट आहे. त्याचं किंवा त्याच्याशी संबंधित कुणाचंही काम दुबईत सुरु नाही अशीही माहिती पोलिसांना मिळाली ज्यामुळे रान्या दुबईत तस्करीसाठी जात असावी असा संशय पोलिसांना आला. तिची झडती घेतली गेली तेव्हा रान्याने तिच्या कपड्यांच्या आतून मांड्या, कंबर या ठिकाणी सोनं लपवलं होतं. एक माहिती अशीही समोर येते आहे की तिने दुबईच्या साधारण ३० फेऱ्या केल्या आहेत. यावेळी मात्र ती पकडली गेली. ज्यानंतर तिच्याकडे १२ कोटी सोनं आढळून आलं जे जप्त करण्यात आलं आणि तिला अटक करण्यात आली होती. आता न्यायालयाने तिला एक वर्षाचा तुरुंगवास सुनावला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
कोण आहे रान्या राव?
३३ वर्षीय रान्या राव ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कन्नड आणि तामिळ भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रान्या रावचा जन्म कर्नाटकातील चिकमंगलूर या गावात झाला. तिने आपलं प्राथामिक आणि माध्यमिक शिक्षण बंगळुरूमधून पूर्ण केलं. सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी रान्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं. २०१४ मध्ये रान्या रावने ‘मानिक्य’ या प्रसिद्ध कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिने अभिनेता सुदीपबरोबर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला, ज्यामुळे अत्यंत कमी वेळात तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. यावर्षी मार्च महिन्यात तिला अटक झाल्याने तिच्या नावाची चर्चा झाली होती.