‘श्वास’ हा मराठी चित्रपट ऑस्करला गेल्यानंतर दिग्दर्शक रवी जाधवने २००४ मध्ये एक जाहिरात लिहिली होती. या मराठी जाहिरातीत बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान काम करत होता. शाहरुख मराठी जाहिरातीत झळकणार म्हणजे, चर्चा तर होणारच! त्यावेळी जाहिरातीची खूप चर्चा झाली. शाहरुखसोबत काम करण्याची ती आठवण रवी जाधवने फेसबुकवर सांगितली.

सुपरस्टार असूनदेखील शाहरुख किती वक्तशीर व नम्र होता, हे रवी जाधवने या पोस्टमधून सांगितले. ‘साधारण २००४ ला मी लिहिलेली ही जाहिरात. श्वास चित्रपट ऑस्करसाठी पाठविल्यानंतरची. पहिल्यांदाच शाहरुख खानसारखा मोठा सुपरस्टार अस्सल मराठी जाहिरातीत काम करत होता. सेटवर अगदी नवख्या अभिनेत्याप्रमाणे सर्व सूचनांचे पालन करीत होता. मराठीच्या प्रत्येक उच्चारांवर काम करीत होता. प्रत्येक शॉटसाठी मेहनत घेत होता. कलाकार जितका मोठा तितकाच तो वक्तशीर आणि पाय जमिनीवर ठेवून सर्वांशी मिळून मिसळून काम करणारा असतो हे याचा क्षणोक्षणी प्रत्यय येत होता,’ असं त्याने लिहिलं.

आणखी वाचा : भाऊ कदम व अशोक सराफ ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हजर

ही जाहिरात प्रचंड गाजली आणि रवी जाधवचा ग्राफिक डिझायनर ते लेखक, दिग्दर्शक हा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. या जाहिरातीतील एका योगायोगविषयी रवी जाधवने पुढे लिहिलं, ‘या जाहिरातीत तमाशातील एक ‘नाच्या’ सहज येऊन जातो. त्यावेळी मला माहित नव्हते की कालांतराने ‘नाच्या’ ह्याच व्यक्तीरेखेवर मी माझा पहिला चित्रपट दिग्दर्शित करणार आहे ज्याचे नाव असेल ‘नटरंग’.’