जन्मदिनी आठवणींना उजाळा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सहज सुंदर असा अभिनय नसतोच, तो प्रचंड मेहनतीने तसा घडवावा लागतो आणि रीमाने तो मेहनतीने अंगी बाणवला होता, अशा शब्दांत अभिनेत्री रिमा यांच्या अभिनयाचे सामथ्र्य ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी उलगडून दाखवले. एक आठवण सांगताना बाई म्हणाल्या की ‘आमची एक गँग होती. रिमा त्यात नंतर आली, पण गँगचा एक अविभाज्य घटक बनली. ‘पुरुष’मधील स्वत:ची भूमिका रिमाने एवढय़ा उंचीला नेऊन ठेवली की तिच्या अनुपस्थितीत भक्ती बर्वेने जेमतेम २५ प्रयोग कसेबसे केले. तिशी कबुलीही भक्तीने माझ्याकडे त्या वेळी दिली होती.

हिंदी-मराठी चित्रपट, नाटक, मालिका या तिन्ही क्षेत्रांत आपल्या सहजअभिनयाचा ठसा उमटवलेल्या अभिनेत्री रीमा यांचे १८ मे रोजी निधन झाले. २१ जून हा रीमा यांचा जन्मदिवस. यावर्षी त्यांचा ६० वा वाढदिवस होता. हेच निमित्त साधून रीमा यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानाला सलामी देणारा आगळा वेगळा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विजयाबाईंनी रीमा यांच्या आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमाला दिग्दर्शक महेश भट्ट, अभिनेत्री रेखा, रेणूका शहाणे, सूरज बडजात्या, सचिन पिळगांवकर अशी त्यांच्याबरोबर काम केलेली अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित राहिली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रेणुका शहाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील सुलोचना दीदी, डॉ. श्रीराम लागू यांच्यासह रीमा यांच्या सुरूवातीच्या काळातील सांगितलेल्या आठवणींची ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली. त्यांची जुनी छायाचित्रे, नाटक-चित्रपटातील दृश्येही या वेळी दाखवण्यात आली. डॉ. लागूंनी ‘सिंहासन’ सिनेमाच्या वेळची आठवण सांगितली. त्यांनी रीमा यांना पाहताच प्रथम ही मुलगी नको, असे सांगितले होते, पण नंतर तिच्याबरोबर काम करायला लागल्यावर, तिच्या जबरदस्त क्षमतेची कल्पना आल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reema lagoo memory
First published on: 24-06-2017 at 05:00 IST