“चांगला चित्रपट आहे. तो पाहताना वेळ कधी आणि कसा निघून गेला हे कळलंच नाही मला. रंजन करता करता बरंच काही सांगून जातो हा चित्रपट…..” हे दिलीप कुमार जयश्री गडकर यांना पुणे येथे ‘एक गाव बारा भानगडी’ चित्रपट पाहिल्यावर म्हणाले होते. हे खूपच मोठे प्रमाणपत्र आहे अशीच जयश्रीजींची भावना होती अशा एकदा त्या मला म्हणाल्या…
हिंदी ताऱ्याने मराठी चित्रपट व कलाकाराला मन:पूर्वक शुभेच्छा देण्याची परंपरा खूप मोठी व वैशिष्ट्यपूर्ण! सलमान खानने ‘FU’चा फर्स्ट लूक रसिकांसमोर आणणे, ह्रतिक रोशनने ‘ह्रदयांतर’चे पोस्टर साकारणे अशा ऑनलाईन शुभेच्छांपर्यंत ही यशस्वी वाटचाल आहे. नुसती उदाहरणे दिली तरी केवढी होतील. पण तेवढ्यावरच ही रंजकता थांबत नाही. ‘अशी ही बनवाबनवी’च्या ज्युबिली सोहळ्यास चित्रपती व्ही. शांताराम व दिलीप कुमार एकत्र आल्याचे दिसतात तेव्हा तो मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मोठाच क्षण असतो. ‘एकापेक्षा एक’च्या रौप्य महोत्सवाचे स्मरण चिन्ह अमिताभ बच्चनच्या हस्ते स्वीकारल्याचा क्षण त्यातील कलाकारांसाठी आयुष्याचा खूप मोठा ठेवा असतो. याच अमिताभच्या शुभ हस्ते ‘ढोलकी’चा फर्स्ट लूक सादर झाला तेव्हा सिध्दार्थ जाधवला झालेला उत्स्फूर्त आनंद शब्दांत पकडता येणार नाही असाच. अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतेय ते आपण लहानपणापासून कसे विलक्षण चाहते आहोत हे सिद्धार्थ अगदी मनोमन अमिताभला सांगत होता. सिद्धार्थच्या कारकिर्दीतील हा प्रचंड रोमांचक क्षण ठरावा. ‘पळवा पळवी’च्या वेळेस दादा कोंडके व जितेंद्र आणि ‘नवरी मिळे नवर्याला’च्या ज्युबिलीसाठी सचिन पिळगावकर व जितेंद्र एकत्र येऊन सोहळा साजरा होणे वेगळेपण ठरते. जितेंद्र आला व छान मराठीत भाषण देऊन गेला असे नाहीच. एका यशस्वी मराठी चित्रपटाची हिंदीत रिमेक करण्याचे त्याने तेव्हा खूप प्रयत्न केल्याची चर्चा रंगली. मेहबूब स्टुडिओत ‘स्वर्ग से सुंदर’च्या चित्रीकरणात तो भाग घेत असतानाच त्याला समजले की शेजारच्याच सेटवर दिग्दर्शक राजदत्त ‘पुढचं पाऊल’वर काम करताहेत. त्याने जयाप्रदाला बरोबर घेत राजदत्त यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले ही गोष्ट त्या दिवसांत खूप चर्चेत होती. राकेश रोशनने आपला मध्य भारतातील चित्रपट वितरक ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करतोय म्हणून आवर्जुन मुहूर्ताला हजर लावली. तात्पर्य या गोष्टी मुहूर्तापुरत्याच राहत नाहीत. त्यात असेच छोटे छोटे खूप संदर्भ दडलेत. राजेश खन्नांपासून पूनम धिल्लॉनपर्यंत हिंदीतील अनेक तारे फोटो आणि बातमीपुरते मराठी चित्रपटांच्या मुहूर्तापासून प्रीमियरपर्यंत येत असतात असे नव्हेच. कधी ते त्याच संबंधातून मराठीच्या पडद्यावरही येतात. ‘हमाल दे धमाल’मध्ये कथा वळण घेते तेव्हाच हिंदीचा स्टार हवा होता. अनिल कपूरच्या रुपाने तो मिळाला व वर्षा उसगावकार बरोबरचे दृश्य चित्रीत झाले.
सुषमा शिरोमणीच्या ‘फटाकडी’मध्ये कुठं कुठं जायाचं हनिमूनला…’ या फक्कडबाज लावणीवरचे रेखाचे नृत्य लोकप्रिय झाले एवढ्यावरच ही गोष्ट थांबत नाही तर हे यश समजल्यावर रेखानेच आपले पडद्यावरचे नृत्य पाहायची व्यक्त केलेली इच्छा सुषमाने एका मिनी थिएटरमधे पूर्ण केली. अशाच छोट्या छोट्या गोड गोष्टींतून हा प्रवास गुंफलाय. कधी एखाद्या मराठी कलाकाराची यामुळेच हिंदीतील मोठा स्टार भेटल्याची दीर्घकालीन इच्छा पूर्ण होते तर कधी हाच हिंदी स्टार मराठी चित्रपट पाहतो हे स्पष्ट होते. कधी एखाद्या निर्मात्याचे वलय कायम राहते. अनिल कपूरच्या हस्ते एन. चंद्राच्या ‘घायाळ’चा मुहूर्त असाच म्हणायला हवा. या सार्यातून या दोन चित्रपटसृष्टीतील अंतरही नकळत कमी होते. फारपूर्वी तर ते केवढे तरी होते. तेव्हा मराठी चित्रपटसृष्टी आपण बरे आपले काम बरे अशाच मध्यमवर्गीय मानसिकतेत होती व हिंदीचे विश्व म्हणजे केवढे तरी दूरचे वाटे. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण चित्रनगरीत मराठी चित्रपटावरच्या कलाकारांना जवळपास हिंदीतील स्टार काम करतोय समजले तरी ते मधूनच वेळ काढून जात. आशालताने ‘अपने पराये’द्वारे हिंदीत पाऊल टाकल्यावर नटराज स्टुडिओत चित्रीकरण असताना समजले की शेजारच्याच सेठ स्टुडिओत आपला अत्यंत आवडता राजेश खन्ना शूटिंग करतोय म्हणून त्या आपल्या सेक्रेटरीसोबत तेथे गेल्या. पण राजेश तसा मूडी. त्याने फारसे लक्ष न दिल्याने आशालता नाराज झाल्या. पण खरी गंमत पुढेच आहे. काही दिवसांनी याच राजेशसोबत आशालताला ‘दिल ए नादान’मधे भूमिका मिळाली. पहिलेच चित्रीकरण चैन्नईत. तेव्हाचे मद्रास. तेव्हा राजेश खन्ना आशालताला भेटता क्षणीच म्हणाला; अब तक नाराज हो?…. हा अनुभव खुद्द आशालताने सांगितलाय. अशा अनेक गोष्टी घडत असतात. आणि त्याच ओळख वा मैत्रीतून हिंदीचे स्टार मराठी सोहळ्यास येतात. रंग भरतात. दिलीप कुमारचे स्तुतीपूर्ण भाषण म्हणजे क्या कहने? लाजवाब…. मला मराठी फारसे चांगले येत नाही. म्हणून मी हिंदीत बोलतो असे शुद्ध मराठीत बोलून मग उर्दूमिश्रित हिंदीत अप्रतिम असे भाषण करणार. या सगळ्याला बातमीमूल्य आहेच, ही छायाचित्रेही प्रसिद्ध होतात. रसिकानाही ते आवडते. माध्यम क्रांतीमधे ते ऑनलाईन झालेय. नवीन पिढीला म्हणूनच सलमान (FU) हृतिक(ह्रदयांतर) यांचा सहभाग आपलासा वाटला. तो आपलेपणाच ही परंपरा छान टिकवून आहे. तरी एक दोन गोष्टी सांगायलाच हव्यात. ‘ताऱ्यांचे बेट’च्या वेळेस एकता कपूरची भेट घेऊन मराठी चित्रपट निर्मितीची तिची भावना जाणून घेता आली. तसे ‘लाल इश्क’चा संजय लीला भन्साळी, ‘व्हेन्टिलेटर’ची प्रियांका चोप्रा या निर्मात्यांबाबत घडले नाही. हिंदी स्टारच्या मराठीला शुभेच्छा ही परंपरा खूप भावनिक तेवढीच ग्लॅमरस आहे हे जास्तच कौतुकास्पद आहे….
– दिलीप ठाकूर