भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘शो मॅन’ अशी ओळख असलेले अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांची २ जून रोजी २८ वी पुण्यतिथी होती. त्या निमित्ताने राज कपूर यांच्याविषयी. ..
राज कपूर यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. १९३५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इन्कलाब’ चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. अभिनेता म्हणून १९४७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नीलकमल’हा त्यांचा पहिला चित्रपट. १९४८ मध्ये त्यांनी ‘आर. के. फिल्म’ची स्थापना केली आणि ‘आग’हा चित्रपट तयार केला. १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’या चित्रपटाने राज कपूर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील ‘आवारा हू’ हे गाणे परदेशातही खूप लोकप्रिय झाले.
लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे हे राज कपूर यांचे स्वप्न होते. अभिनेता होण्यासाठी त्यांनी क्लॅपरबॉय म्हणूनही काम केले आणि केदार शर्मा यांची थप्पडही खाल्ली. दहावीत राज कपूर एका विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी वडिलांना, ‘मला आता पुढे शिकायचे नाही, मला चित्रपटात काम करायचे आहे’असे सांगितले होते. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी राज कपूर यांना निर्माता-दिग्दर्शक केदार शर्मा यांच्या युनिटमध्ये क्लॅपर बॉय म्हणून काम करण्यास सुचविले होते. शर्मा यांच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना राज कपूर एकसारखे आरशाजवळ जायचे आणि केसातून कंगवा फिरवायचे. तसेच क्लॅप देताना आपला चेहरा कॅमेरात दिसेल, याचीही ते काळजी घेत असत. ‘विषकन्या’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना राज कपूर यांचा चेहरा कॅमेऱ्याच्या समोर आला आणि चरित्र अभिनेत्याची दाढी क्लॅपच्या बोर्डावर अडकून निघाली. यामुळे चिडलेल्या केदार शर्मा यांनी राज कपूर यांचा गाल रंगविला. आपल्या केलेल्या कृत्याचा शर्मा यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या ‘नीलकमल’ या चित्रपटासाठी राज कपूर यांना साईन केले.
अनेक नायिकांना दिली ‘प्रथम पदार्पणा’ची संधी
बॉलीवूडचा रुपेरी पडदा पुढे ज्या अनेक अभिनेत्रींनी ‘नायिका’म्हणून गाजविला त्यांना राज कपूर यांनी ‘आर.के’तर्फे रुपेरी पडद्यावर येण्याची पहिली संधी दिली होती. ‘मेरा नाम जोकर’नंतर राज कपूर यांनी ‘बॉबी’ चित्रपटाची निर्मिती केली ज्यात ऋषी कपूर बरोबर नायिका म्हणून डिम्पलला संधी दिली. हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये ‘कोवळ्या वया’तील (टीन एजर) प्रेमकथांच्या चित्रपटाचा पाया घातला. राज कपूर यांनी आपला मुलगा राजीव कपूर याला घेऊन ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात मंदाकिनीला संधी दिली. तर ‘हिना’ चित्रपटात पाकिस्तानी कलाकार झेबा बख्तीयार व मराठी अभिनेत्री अश्विनी भावे हिला संधी दिली. अभिनेत्री निम्मी हिला ‘बरसात’मध्ये भूमिका दिली. बॉलीवूडची ‘स्वप्नसुंदरी’ हेमामालिनी हिला ‘सपनों का सौदागर’ मधून संधी मिळाली. दाक्षिणात्य अभिनेत्री पद्मिनी हिला ‘जिस देश में गंगा बहेती है’ या चित्रपटात राज कपूर यांनी पहिली संधी दिली. या चित्रपटाने पद्मिनीला हिंदी चित्रपटात ओळख मिळाली. राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’मध्येही तिची भूमिका होती.
राज कपूर व नर्गिसची जोडी
बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर राज कपूर आणि नर्गिस ही जोडी लोकप्रिय ठरली. १९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ या चित्रपटानंतर पुढे ‘अंदाज’, ‘जान पहचान’, ‘आवारा’, ‘अनहोनी’, ‘आशियाना’, ‘अंबर’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘चोरी चोरी’ असे चित्रपट एकत्र केले. यातील अनेक चित्रपट व त्यातील गाणी गाजली. ‘श्री ४२०’ चित्रपटातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. अनेक चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात या गाण्यावर आत्ताच्या पिढीतील कलाकार नृत्य करतात.
राज कपूर यांचा ‘आवाज’ म्हणजे मुकेश
राज कपूर आणि पाश्र्वगायक मुकेश यांचे अतूट नाते तयार झाले होते. राज कपूर यांचा ‘आवाज’ अशीच मुकेश यांची ओळख होती. राज कपूर यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात पडद्यावर गाणे म्हणतानाचा राज कपूर यांचा आवाज मुकेश यांचाच होता. मुकेश यांच्या निधनानंतर राज कपूर यांनी व्यक्त केलेली ‘लगता है मेरी आवाज ही चली गई’ ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे.
‘हिना’ पाहायला राज कपूर नव्हते
‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानंतर राज कपूर यांनी ‘हिना’ चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली. पण हा चित्रपट त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. २ जून १९८८ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर हा चित्रपट पूर्णत्वास गेला.
२ मे ते २ जून १९८८
‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. राज कपूर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आणि २ मे १९८८ मध्ये नवी दिल्ली येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. राज कपूर प्रेक्षागृहात आसनावर बसले होते. त्यांचे नाव जाहीर झाले पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आसनावरून उठून व्यासपीठावर जाणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे तात्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण हे स्वत: व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यांनी राज कपूर यांच्या आसनापाशी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला. त्याच क्षणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खुर्चीतच कोसळले. त्यांना तातडीने अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेत उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांनी महिनाभर मृत्यूशी झुंज दिली, पण २ जून १९८८ मध्ये त्यांनी जगातून ‘एक्झिट’ घेतली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader