होस्टेल लाइफ म्हणजे कोणाच्याही आयुष्यातील असे दिवस, ज्यात रात्रीचे रूपांतर दिवसात होते आणि मित्रमंडळींचे रूपांतर कुटुंबियांमध्ये. गर्लीयापा वाहिनी व्हिस्परच्या साथीने आपली ही नवीन मालिका ‘गर्ल्स हॉस्टेल’ सादर करत आहे. यामुळे प्रेक्षकांचे होस्टेलचे अनुभव ताजे होण्यास मदत होणार आहे. ७ डिसेंबरपासून दर आठवड्याला ही मालिका प्रसारित होणार आहे. चार मैत्रीणींची ही मालिका त्यांच्या आयुष्याभोवती फीरते. या सगळ्या सेंट जॉन्स डेंटल कॉलेजमध्ये शिकत असून त्या होस्टेलमध्ये राहत असतात. टीव्ही अभिनेत्री अहसास चन्ना रिचाची भूमिका करणार आहे. ही नागपूरहून नुकतीच आलेली १८ वर्षांची मुलगी आहे. सिमरन नाटेकर मिलीच्या भूमिकेत आहे. ही एका श्रीमंत कुटुंबातील लाडावलेली मुलगी आहे. सृष्टी श्रीवास्तव ज्योची भूमिका साकारत आहे. ही मुलगी आयुष्य तिला हवे तसे जगते, तिला वाढवण्यात आले आहे तेही टॉमबॉयप्रमाणे. त्याचप्रमाणे टीव्ही अभिनेत्री पारुल गुलाटी झहीरा या सर्वार्थाने कॉलेज क्वीन असलेल्या एका मुलीची भूमिका करत आहे.

या नव्या मालिकेविषयी सांगताना अहसास चन्ना (रिचा) म्हणाली, “होस्टेल लाइफ आपल्याला स्वत:बद्दल आणि एकंदर आयुष्याबद्दल खूप काही शिकवते यावर माझा खरोखर विश्वास आहे. गर्ल्स होस्टेलसाठी शूटिंग करताना खूप मजा आली आणि आम्ही चौघी आता खरोखरच्या रूममेट्ससारख्या झालो आहोत.” सिमरन नाटेकर (मिली) म्हणते, “होस्टेलमधील मौजमजेने भरलेल्या रात्रींपासून ते कॉलेजातील परस्परविरोधी गटांपर्यंत सगळ्याची चव ही मालिका प्रेक्षकांना देणार आहे. प्रेक्षकांपैकी अनेकजण यामध्ये स्वत:ला बघू शकतील.”

गर्ल्स होस्टेल ही गर्लीयापाची ओरिजिनल मालिका असून, चैतन्य कुंभकोणम यांनी दिग्दर्शित केली आहे. या चौघी त्यांच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी एकत्र आल्या आहेत; हुकूमशाही वृत्तीचे पालक, अतिरेकी वॉर्डन्सपासून त्यांना भेटणाऱ्या दुष्ट स्वभावाच्या मुलींपर्यंत अनेक समस्या त्यांच्यापुढे आहेत. गर्ल्स होस्टेल ही एक विनोदी रोलर कोस्टर सफर असून यात खऱ्याखुऱ्या मानवी भावनांना कोणालाही आपलेच वाटतील अशा होस्टेलमधील अनुभवांची जोड देण्यात आली आहे.