अभिनेत्री रिचा चड्डाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मसान’ चित्रपटाची खूप सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात आली आहे. पण, सर्वांच्या प्रशंसा एकवटत असलेल्या रिचाला तिच्या आईने केलेली प्रशंसा जास्त महत्त्वाची वाटते.
रिचाच्या आईने ‘मसान’च्या यशाबद्दल तिला खास भेट दिली आहे. मुंबईत राहत असलेल्या रिचाला तिची आई अचानकपणे भेटण्यास आली होती. यावेळी त्यांनी तिला सोन्याचे कानातले भेटस्वरुपात दिले. त्यावर भावूक झालेल्या रिचाने तिच्या आईला लगेचं मिठी मारली. विशेष म्हणजे तिला आईने दिलेले हे कानातले तिच्या आजीचे होते. त्यांच्या घरात एका पिढीकडून दुस-या पिढीकडे परंपरागत आलेल्या कानातल्यांचे महत्त्व रिचासाठी अनन्यसाधारण आहे. रिचाची आई म्हणाली की, ‘मसान’मधील काम पाहून मला रिचाचा अभिमान वाटतोय. मी तीनवेळा हा चित्रपट पाहिला. मला रिचाला अशी भेट द्यायची होती जी तिला देणं सार्थ ठरेल. त्यामुळेचं मी तिला कानातले देण्याचा निर्णय घेतला.
यावर रिचा म्हणाली की, माझे डोळे नेहमीचं या कानातल्यांवर होते. मात्र, मला ते मिळतील अशी आशाचं नव्हती. माझे आई-वडिल त्यांच्या भावना कधीचं बोलून दाखवत नाही. पण माझ्या कामाचा त्यांना किती अभिमान आहे याची जाणीव मला ते काहीनाकाही भेटवस्तू देऊन करून देत असतात. यातूनचं मला अधिकाधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.