बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांच्या ट्विटवरुन पुन्हा एकदा वादग्रस्त चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. ऋषी कपूर सोशल मीडियामध्ये चांगलेच सक्रिय आहेत. त्यांच्या ट्विटरच्या वक्तव्यावर अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र वादानंतरही त्यांचा हा स्वभाव बदललेला नाही. त्यांच्या ट्विटरवरील वक्तव्यावर अनेकदा नेटिझन्सनीं तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या त्या वेळी त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान आता त्यांच्या ट्विटवर तिखट प्रतिक्रिया देणाऱ्या महिलांचा ते अपशब्दात समाचार घेत असल्याचे समोर आले आहे. काही नेटिझन्सनी ऋषी यांच्या या प्रकाराला ट्विटरच्या माध्यमातूनच समोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. विशेष म्हणजे ऋषी कपूर यांनी महिलांना वापरलेल्या अपशब्दांचा स्क्रिन शॉट शेअर करत नेटिझन्सनी ऋषी यांच्यातील हा छुपा स्वभाव दाखवून दिला आहे. ट्विटरवरील प्रत्युत्तराबाबत हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना ऋषी कपूर म्हणाले की, माझी जर कोणी खिल्ली उडवत असेल तर मी शांत बसू शकत नाही. जे लोक माझ्यावर हल्ला करतात त्यांना मी वैयक्तिक पातळीवर उत्तरं देतो. ते मला फॉलो करत असल्यामुळेच मी त्यांना वैयक्तिकरित्या संदेश पाठवू शकतो, असेही ते म्हणाले.

करण आणि माझ्यात काय साम्य आहे सांगा? असा प्रश्न ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून केला होता. त्यावर काहींनी त्यांना जमेल तसे प्रश्नाचे उत्तर दिले तर काहींनी यावरून त्यांची खिल्ली उडवली. त्यावर रागावलेल्या ऋषी यांनी काही नेटिझन्सना मेसेजमधून थेट उत्तर देत शिवीगाळ केली. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पाकिस्तानी टेलिव्हिजनवरील लीग सामन्यांच्या प्रक्षेपणासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यांच्या या ट्विटवर अनेक नेटिझन्सनी व्यक्त होण्यास सुरुवात केली होती. या प्रश्नावर उमटलेल्या प्रतिक्रियानंतर ऋषी कपूर यांनी काहींना ब्लॉक देखील केले होते.
यापूर्वी ‘लाला लँड’ या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाल्यानंतर ऋषी यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. यावेळी त्यांच्यावर दारुच्या सवयीवरुन टोमणे मारल्याचे पाहायला मिळाले होते.

त्यांच्या मद्यपानावर अनेकदा टीका झाली असली तरी त्यांच्यावर याचा फारसा परिणाम झालेला नव्हता. याचेच एक उदाहरण ऋषी कपूर यांनी ‘व्हेलेंटाइन डे’च्या दिवशी दाखवून दिले होते. दारुच्या बाटलीचा फोटो त्यांनी शेअर केला होता. त्यांच्या या ट्विटवर देखील अनेक प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले होते. याव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर ‘खुल्लमखुल्ला’ या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. त्याच्या या पुस्तकातून बॉलिवूडमधील अनेक घटनांचा खुलासा समोर आला होता. या पुस्तकातून बॉलिवूडमधील अनेक घटना समोर आल्याचे पाहायला मिळाले होते.