काही वर्षांपूर्वी आलेला बॉलिवूडचा ‘धूम’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. बँक लुटून बाईक्सवरून क्षणार्धात गायब होणाऱ्या कूल आणि स्मार्ट चोरांची प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना हा अनुभव घेता येणार आहे. मात्र, यावेळचा अनुभव काहीसा मजेशीर आणि विनोदी असेल. रितेश देशमुख आपल्या दोन सहकऱ्यांसोबत ‘बँक चोर’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय यांच्या ‘बँक चोर’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाच्या ट्रेलरची सुरूवातच ‘धूम’ सिनेमातील तीन चोर अर्थात जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खान यांच्यापासून होते. या तीन चोरांनंतर आता रितेश चंपक चंद्रगुप्त चिपळूणकर बनून बँक लुटणार आहे.
ट्रेलरमध्ये बँक लुटण्यासाठी रितेशने एका स्वामीचे रुप धारण केले. त्याच्या गुलाब आणि गेंदा दोन मित्रांनीही बँकेत आपले तोंड कोणाला दिसू नये म्हणून हत्ती आणि घोड्याचे मुखवटे लावले आहे. ट्रेलरवरून तरी हे जगातले सगळ्यात कच्चे चोर असल्याचे दिसते. सिनेमात रिया चक्रवर्तीही आहे. या सिनेमात विवेक पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल तर रिया पत्रकाराच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण आहे ते म्हणजे बाबा सेहगल.
बँकेमध्ये ओलीस ठेवलेल्या लोकांमधला एक बाबा सेहगल असतो, जो तिथे बंदी असूनही रॅप गाणे करत असतो. ‘लिप्स हैं तेरे लाल, काले हैं तेरे बाल, पहले आया अन्ना बाद में केजरीवाल’ हे रॅपही तो बसल्या बसल्या ऐकवतो. एकंदरीत सिनेमाचा ट्रेलर फार मजेशीर आहे. येत्या १६ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
बंपी दिग्दर्शित ‘बँक चोर’ या सिनेमाची निर्मिती यश राज बॅनरचे यूथ प्रॉडक्शन हाऊस ‘व्हाय- फिल्म्स’ करत आहे. ‘व्हाय- फिल्म्स’ने याआधी ‘मॅन्स वर्ल्ड’, ‘बँड बाजा बारात’ आणि ‘लेडिज रूम’ यांसारख्या वेब सिरीजची निर्मिती केली आहे.