प्रतिनिधी, मुंबई ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा पार केला. पडद्यावर भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि आहाराकडे खूप लक्ष देतो. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेतील अनुभवलेलं वळण म्हणजे राणाला मॅटवरची कुस्ती शिकवायला आलेली नवीन लेडी मॅनेजर. आधीच राणा त्याच्या नंदिता वहिनींचा शब्द पाळण्यासाठी त्याच्या मनाविरुद्ध मॅटवरची कुस्ती खेळायला तयार झाला आहे आणि त्यात मुलींपासून चार हात दूर राहणाऱ्या राणाला मॅटवरची कुस्ती शिकवण्यासाठी एक लेडी मॅनेजर म्हणजेच सखी आल्यामुळे त्याची पळापळ सुरू आहे. सखीची व्यक्तिरेखा अभिनेत्री रुचा आपटे साकारते आहे. राणाला मॅटवरील कुस्तीचे धडे देणारी ही धाडसी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे. राणाला कुस्तीचे सल्ले देताना ती राणाशी कठोरपणे बोलते वेळ पडली तर त्याचा अपमानही करते. या व्यक्तिरेखेसाठी रुचा मेहनतदेखील घेत आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याचं काटेकोर पालन रुचा करतेय. याबद्दल रुचा म्हणाली, ‘सखी ही खूप व्यवहारी मुलगी आहे. शहरातील ही मुलगी राणाला मॅटवरील कुस्तीचे छक्केपंजे शिकवायला कोल्हापुरात आली आहे. माझ्या देहबोलीतून कुस्तीपटू साकारणं मी शिकतेय. खूप कमी वेळात मी कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं आणि ते दृश्यांमध्ये दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मालिकेत दाखवल्याप्रमाणे मी राणाला तीन वेळा जमिनीवर पाडते. या प्रसंगाच्या वेळी राणाने मला सांभाळून घेतले. त्याला बऱ्यापैकी कुस्ती जमते आणि त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना तो मलाही सांभाळून घेतो’.