आजकाल महाराष्ट्रात हवा आहे ती ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावून टाकले आहे. मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. खुद्द बॉलीवूडकरही या कार्यक्रमात येण्याचा मोह आवरू शकलेले नाहीत. जॉन अब्राहम, सोनम कपूर आणि बॉलीवूड बादशहा शाहरुख खान यानेही या कार्यक्रमात उपस्थिती लावली आहे. पण या मोठ्या कलाकारांच्या उपस्थितीतही नेहमी भाव खाऊन गेले ते ‘चला हवा येऊ द्या’तील कलाकार नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे. मात्र, यावेळच्या भागात एक वेगळीच गोष्ट घडली. मंचावर ज्याच्या आगमनाने प्रेक्षकांच्या शिट्टयांवर शिट्या वाजतात आणि टाळ्यांचा कडकडाट होतो तो भाऊ कदम यावेळच्या भागात दिसलाच नाही. त्यामुळे सर्वच प्रेक्षकांना भाऊ कदम गेला तरी कुठे? असा प्रश्न पडला.
झाले असे की, महाराष्ट्र दौऱ्यावर असलेली ‘चला हवा येऊ द्या’ची टीम सोलापूरमध्ये पोहोचली. या भागात बहुप्रतीक्षित ‘सैराट’ या चित्रपटातील कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी भाऊ कदमची अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती. बराच वेळ होऊनही भाऊ मंचावर न आल्याने उपस्थित प्रेक्षकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यावर कार्यक्रमाचा सूत्रधार नीलेश साबळेने सर्वांची माफी मागत भाऊ कदमची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. तसे सर्व प्रेक्षक शांत झाले. पण भाऊच्या अनुपस्थितीमागचे कारण काही वेगळेच होते. खरंतर भाऊ सध्या नाटकाच्या प्रयोगासाठी अॅमस्टरडॅम येथे असून, तो पुढच्या आठवड्यात भारतात परतणार आहे. त्यामुळे असा प्रश्न पडतो की, भाऊ अॅमस्टरडॅममध्ये असताना नीलेशने त्यांची तब्येत ठीक नसल्याचे का सांगितले? प्रेक्षकांना शांत करण्यासाठी भाऊ नक्की कुठे आहे, हे सांगणे नीलेशला सहज शक्य होते. तरीही त्याने भाऊची तब्येत ठीक नसल्याचे सांगत वेळ मारून का नेली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



