गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लकी अली आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या निधनाच्या अफवा सुरु होत्या. आता त्या पाठोपाठ भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांची प्रकृती बिघडल्याच्या अफवा सुरु झाल्या होत्या. पण किरण खरे यांचे पती ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे.

किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात होते. त्यानंतर अनुपम खेर यांनी ट्वीट करत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. ‘सध्या सोशल मीडियावर किरण खेर यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. त्या सर्व चुकीच्या आहेत. त्यांची प्रकृती ठिक आहे. तसेच किरण यांनी लशीचा दुसरा डोस देखील घेतला आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की अशा नकारात्मक अफवा पसरवू नका. धन्यवाद. सुरक्षित रहा’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले होते.

आणखी वाचा : ‘मदतीचे नाटक करण्यापेक्षा…’, अक्षयला ट्रोल करणाऱ्यावर भडकली ट्विंकल

किरण खेर या चंदीगढ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी ३१ मार्च रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला खासदार किरण खेर या अनुपस्थित होत्या. त्यावेळी अरुण यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती दिली. ६८ वर्षी खेर यांना गेल्यावर्षी या आजाराचं निदान झालं होतं. सध्या त्या उपचार घेत असून मुंबईमध्ये आहेत अशी माहितीही अरुण सूद यांनी दिली. त्यानंतर अनुपम खेर यांनी ट्वीट करत किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.