रेश्मा राईकवार

ग्रामीण कथा, तिथला गावगाडा, निसर्ग आणि घरच्यांशी घट्ट जोडलेली माणसं हा सगळाच अस्सल गावरान ठसकेबाज मामला आपण कित्येकदा मराठी चित्रपटातून उभा केलेला पाहायला आहे. पण गेल्या काही वर्षांत नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडे यांच्या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर त्या मातीतल्याच कलाकारांना घेऊन त्यांचा लहेजा, भाषा यांना धक्का न लावता कथा रंगवणारे अनेक चित्रपट सातत्याने येत आहेत. कुठलीही धाटणी नसलेले अगदी सहजशैलीतील हे चित्रपट पाहणं हाही एक वेगळा अनुभव असतो. भाऊसाहेब शिंदेंचा ‘रौंदळ’ हा या अस्सल ठसकेबाज ग्रामीण चित्रपटांची मांदियाळी पुढे नेणारा चित्रपट आहे असं म्हणता येईल.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

‘रौंदळ’ म्हणजे तुडवून नाश करणं या अर्थाला शब्दश: जागणारी अशी या चित्रपटाची कथा आहे. कथा पूर्णपणे नवीन आहे असं नाही. शेतीमालाला योग्य भाव न देता शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी दलालांची आणि एकूणच सरंजामी व्यवस्था याचं चित्रण या कथेत आहे. व्यवस्थेशी समझौता करून जगायचा पर्याय निवडा वा नडायचं ठरवून ठाम उभं राहिलात तरीही त्याची त्या त्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबाला मोजावी लागणारी किंमत फार मोठी असते. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’मध्येही शेतकऱ्यांवरचा अन्याय, कवडीमोल भावात त्यांच्या जमिनी विकत घेऊन पुन्हा त्यांच्यावरच अरेरावी करणारी व्यवस्था याचं चित्रण होतं. ‘रौंदळ’ची कथाही सर्वसाधारणपणे त्याच पद्धतीची असली तरी याची धाटणी अस्सल ग्रामीण बाजाची आहे. हिंगणी गावातला एक सर्वसामान्य तरुण शिवा. सैन्यात जायचं त्याचं स्वप्न भंगतं आणि त्याचे आजोबा त्याला घरची शेती वाढवण्याचं, टिकवण्याचं स्वप्न हातात ठेवतात. शिवाही आई-वडील, आजोबा, मित्र यांच्याबरोबरीने कष्ट करून ऊस पिकवतो. मात्र गावकऱ्यांनी आपल्याला मतं दिली नाहीत, हा डुख मनात ठेवणारे साखर कारखानदार गावातील कोणाचाच ऊस घेत नाहीत. पडेल त्या भावाने घ्या, आजन्म तुम्हालाच मतं देऊ.. अशी कुठलीही विनवणी ना शिवाच्या वडिलांच्या मदतीला येत ना गावकऱ्यांच्या.. शिवा या व्यवस्थेविरुद्ध जाब विचारायचा प्रयत्न करतो. अरे ला कारे करायचा त्याचा प्रयत्न त्याचं जगणं अधिकाधिक अवघड करत जातो. विषाशी खेळ झाल्यानंतर त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करूनही शिवाला पुन्हा एकदा त्याच दलदलीत ओढण्याचा प्रयत्न होतो तेव्हा मात्र रौंदळ घडतो.

‘रौंदळ’ची कथा आणि दिग्दर्शन गजानन पडोळ यांनी पेलली आहे. दिग्दर्शकीय पदार्पण असलं तरी चित्रपटाच्या मांडणीत कुठेही हा नवखेपणा जाणवत नाही. ग्रामीण चित्रपटाचे म्हणून जे काही ठरीव साचे असतात ते भडक नाटय़, लावणी-तमाशा घुसडणं अशा कुठल्याही मुलाम्याचा लवलेश यात नाही. त्यामुळेच असेल कदाचित साधी-सरळ मांडणी असलेला हा चित्रपट पाहावासा वाटतो. प्रत्यक्ष गावातली घरं, तिथलं रोजचं जगणं, एकमेकांमधला संवाद-नाती सगळं खूप सहजपणे रंगवलं आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट मनाला अधिक भिडतो. आजोबांच्या भूमिकेतील डॉ. संजय लकडे, वडिलांच्या भूमिकेतील गणेश देशमुख या दोघांच्याही व्यक्तिरेखा पडद्यावर खूप छान पद्धतीने उलगडत गेल्या आहेत. कुठलाही अभिनिवेश नसलेला अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्टय़ म्हणता येईल. नायकापेक्षा चित्रपटाचा खलनायक म्हणून अभिनेता यशराज डिंबळे भाव खाऊन जातो. भाऊसाहेब शिंदेंनी साकारलेला शिवा असो वा नायिकेच्या भूमिकेतील नेहा सोनावणे प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय सहज-संयमी शैलीत रंगवलेली असल्याने चित्रपटाची मांडणी खोटी वाटत नाही. मात्र गाण्यांची संख्या थोडी मर्यादित करता आली असती तर चित्रपट अधिक आटोपशीर झाला असता. कथानकात काही मुद्दे दिग्र्दशकाने असेच सोडून दिले आहेत, त्याची उत्तरं कुठेच मिळत नाहीत. पत्रकाराची हत्या, आजोबांवरचा हल्ला हे फक्त प्रसंग मांडण्यापुरते वापरून सोडून दिले आहेत. किंबहुना मांडून सोडून देण्याच्या या प्रकाराने चित्रपटाचा प्रभाव मर्यादित केला आहे. ‘भलरी’ हे या चित्रपटातलं लोकगीतही खास पाहण्यासारखं आहे. नेहमीच्या त्याच त्याच ठरीव पद्धतीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा अनुभव ‘रौंदळ’ सारखा ग्रामीण ठसका असलेला चित्रपट देतो यात शंका नाही.

रौंदळ

दिग्दर्शक – गजानन पडोळ, कलाकार – भाऊसाहेब शिंदे, नेहा सोनवणे, संजय लकडे, यशराज डिंबळे, गणेश देशमुख, शिवराज वाळवेकर.