पहिल्या पाच दिवसात चक्क ३५० कोटींचा आकडा पार करणाऱ्या साहोला सुपरहिट म्हणावे की सुपरफ्लॉप अशी काहीशी विचित्र परिस्थीती निर्माण झाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास अभिनित साहो या चित्रपटाला चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला खरा, मात्र समिक्षकांनी प्रेक्षकांच्या बरोबर उलट भूमिका घेतल्यामुळे आता नव्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा की पाहू नये याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच एका प्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शकाने साहोच्या पटकथेवर चोरीचे आरोप केल्यामुळे या गोंधळात आता आणखीनच भर पडली आहे. परिणामी पहिल्याच दिवशी चक्क ६८ कोटींची विक्रमी कमाई करणाऱ्या साहोच्या कमाईचा वेग पुढच्या चार दिवसात मंदावत गेला. या चित्रपटाने पाचव्या दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला खरा, परंतु साहोने केलेली जाहिरात व सुपरस्टार प्रभासची लोकप्रियता पाहता हा विक्रम त्यांनी तिसऱ्याच दिवशी करणे अपेक्षित होते. या संपूर्ण प्रकरणाला नियंत्रीत करण्यासाठी आता खुद्द साहोचा दिग्दर्शकच पुढे सरसावला आहे.

साहो चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत याने प्रभासच्या चाहत्यांना हा चित्रपट पुन्हा एकदा पाहण्याची विनंती केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहून हे आवाहन केले आहे. “मी वयाच्या १७ व्या वर्षी माझा पहिला लघुपट तयार केला होता. अगदी प्रतिकूल परिस्थितीत तयार केलेल्या या लघुपटातील ९० टक्के काम मी स्वत:च केले होते. दरम्यान मला माझ्या कुटुंबाने आर्थिक व मानसिक आधार दिला. मी माझ्या चुकांची पुनरावृत्ती न करता त्यातून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच मला साहो सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. साहो चित्रपटामध्येही मी काही चुका केल्या असतील परंतु पुढल्यावेळेस त्या होणार नाही, याची काळजी मी घेईन. साहो पाहिलेल्या समस्त प्रेक्षकांचे आभार. कृपया त्यांनी पुन्हा एकदा या चित्रपटाचा आनंद घ्यावा ही निनंती.” अशा शब्दात त्याने प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा एकदा पाहण्याचे भावनिक आवाहन केले आहे.

दक्षिण भारतातील सिनेप्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारासाठी अक्षरश: वेडे असतात असे म्हटले जाते. या पार्श्वभूमिवर विचार करता दिग्दर्शक सुजीतचे भावनिक आवाहन नेमका कोणता करिश्मा करते हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल.