मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच मराठी रंगभूमीवर दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविला. अमरापूरकर यांनी रंगविलेली ‘झिमू’ही व्यक्तिरेखा ‘धनगरवाडा’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आली आहे. अमरापूरकर यांची भूमिका असलेला आणि त्यांचा अभिनय असलेला हा शेवटचा चित्रपट ठरला आहे.
विजयकुमार दळवी यांच्या ‘धनगरवाडा’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. प्रकृती साथ देत नसतानाही अमरापूरकर यांनी ‘धनगरवाडा’चे चित्रीकरण पूर्ण केले. धनगरवाडय़ातील ‘झिमू’ही व्यक्तिरेखाच या चित्रपटाची खरी नायक आहे.
कोल्हापूर-कर्नाटक सीमेवरील चंदनगडच्या जंगलात सुमारे तीन हजार फूट उंचीवरील धनगरपाडय़ावर चित्रपटाचे चित्रीकरण झाले. अमरापूरकर यांच्यासह चित्रपटात वरद चव्हाण, पल्लवी पाटील, मिलिंद गवळी, गणेश यादव, माधव अभ्यंकर, सुहासिनी देशपांडे, पूजा पवार, जयवंत वाडकर, अतुल आगलावे हे कलाकार आहेत.
विजयकुमार दळवी व प्रकाश मसुरकर निर्मित आणि अलका कुबल-आठल्ये व शिल्पा मसुरकर यांची ही प्रस्तुती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadashiv amrapurkar play role in dhangarwada
First published on: 28-11-2015 at 01:32 IST