एकीकडे अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘संजू’ची जोरदार चर्चा असताना दुसरीकडे त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. संजय दत्तची मुख्य भूमिका असलेल्या ‘साहेब बिवी और गँगस्टर ३’ या चित्रपटाचा ट्रेलर आज (शनिवारी) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘साहेब बिवी और गँगस्टर’च्या याआधीच्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी केली आहे. यात पहिल्यांदाच संजय दत्तची एण्ट्री झाली आहे.

तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित ‘साहेब बिवी और गँगस्टर’ या चित्रपटाच्या सीरीजमधील हा तिसरा चित्रपट असून याआधी २०११ आणि २०१३ मध्ये या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले होते. या चित्रपटामध्ये संजूबाबासोबत जिम्मी शेरगिल, माही गिल, चित्रांगदा सिंग हे कलाकार मंडळीही स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘खेल मे होगा अब तीन गुना ज्यादा खतरा,’ असं कॅप्शन देत संजूबाबाने ट्विटरवर हा ट्रेलर शेअर केला आहे.

जेलमधल्या त्या दिवसांनी माझ्यातील अहंकार मोडला- संजय दत्त

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासूनच त्याविषयी सिनेरसिकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. २७ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा आता ‘साहेब, बिवी और गँगस्टर’चं हे थरारनाट्य तिसऱ्यांदा प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.