सई परांजपे

त्याची आणि माझी दोस्ती तशी जुनीच. नेमकी भेट कधी झाली असं म्हटलं तर धूसर आठवतं ते एक नाटयगृह, रंगमंचावर उभी माझी आई – शकुंतलाबाई परांजपे आणि प्रेक्षागृहातून होणारा टाळयांचा कडकडाट! मी जेमतेम ३-४ वर्षांची असताना आईने तिच्या अष्टावधानी स्वभावानुसार एक स्वत:चं नाटक करायचं ठरवलं. नाव होतं – ‘पांघरलेली कातडी’. या नाटकात तिने लेखन-दिग्दर्शनाच्या बरोबरीने कोळिणीची भूमिका वठवण्याचं ठरवलं. त्यांचं टेचात बोलणं, तो हेल, वावरण्यातले बारकावे हे सारं अंगात मुरावं म्हणून आई दर गुरुवारी पुण्याहून मुंबईला कोळीवाडयात येत असे. लुगडं नेसून चक्क मासे विकायला बसत असे! तिच्यासोबत माझं शेपूट असायचंच. पुढे एनएसडीला अभ्यासक्रमात आलेला स्तानिस्लावास्कीचा ‘पात्र जगण्याचा’ अमूल्य धडा, त्याबद्दलचं कोणतंही पूर्वज्ञान नसतानाही आईने गिरवलेला मी पाहिला. (त्या वयात मात्र कोळीवाडयात जाऊन मासे खायला मिळतात याचीच जास्त मौज वाटत असे.) यानिमित्ताने नाटकाचं जादूई विश्व मला जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. एरवी आपल्याभोवती वावरणारी साधी माणसं, रंगमंचावर गेली की कशी वेगळीच वाटू लागतात हे पाहिलं आणि त्या पिवळया प्रकाशाने, नाटकाने, नकळतच माझ्या मनावर गारुड करायला सुरुवात केली. माझी आणि नाटकाची ही पहिली भेट.

Rape Case
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर तीन दिवस बलात्कार, चेहऱ्यावर तापलेल्या लोखंडी रॉडने लिहिलं अमन
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Thane Police, Arrest Parents, for Allegedly Murdering, One and a Half Year Old Daughter, Investigation Underway, crime in thane, crime in mumbra, parents allegedly murder daughter
मुंब्रा येथे आई-वडिलांकडून दीड वर्षांच्या मुलीची हत्या, निनावी पत्रामुळे हत्येचा उलगडा; दफन केलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक

मी लेखनात रमते हे आईने हेरलं होतं. त्यामुळे रोज तीन पानं लिहिल्याशिवाय खेळायला जायचं नाही असा तिचा दंडक असे. स्फुरलेल्या गोष्टी, व्यक्तिचित्रं, दैनंदिन गमती.. अगदी हवं ते मी लिहायचे. मी ८ वर्षांची असताना माझं ‘मुलांचा मेवा’ हे पुस्तक छापलं गेलं. अर्थात याचं श्रेय सर्वस्वी आईलाच. आजवर जे काही मी करू शकले त्यामागे आई आणि अप्पा (रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे) यांच्या शिकवणीचं श्रेय फार मोठं आहे. या पुस्तकाने प्रोत्साहन, थोडा आत्मविश्वास मिळाला आणि त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट घडली. आपल्या शब्दांनी एक विश्व तयार होतं, नाटय तयार होतं आणि त्यात एक विलक्षण आनंद असतो हे मला जाणवू लागलं.

हेही वाचा >>> ‘तेरवं’ : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची संघर्ष कथा

यथावकाश शिक्षण झालं, मला आकाशवाणीत काम करायची संधी मिळाली. एका नव्या जगाची कवाडं माझ्यासाठी खुली झाली. तिथे अनाउन्सर म्हणून काम करतानाच मी ‘बालोद्यान’शी जोडले गेले. ‘बालोद्यान’ची ताई असतानाचे दिवस म्हणजे माझ्या आणि नाटकाच्या अगदी हृद्य आठवणी आहेत. कारण इथे खऱ्या अर्थाने धडपडण्याची, प्रयोग करण्याची, विविध प्रकारे लिहून पाहण्याची संधी मिळाली. ‘शेपटीचा शाप’, ‘सळो की पळो’, ‘झाली काय गंमत’, ‘मटक्याचं भविष्य’, ‘देवाची फुलं’ अशी कितीतरी बालनाटय़ं नभोवाणीच्या साक्षीने साकारली गेली आणि जरा बिचकतच नाटकाकडे बघणाऱ्या माझी, आता मात्र नाटकाशी गट्टी जमली.

नाटकाचं शिक्षण घेतलं, देशात-परदेशात अगणित नाटकं पाहिली – अभ्यासली.. ‘माझा खेळ मांडू दे’, ‘जास्वंदी’, ‘सख्खे शेजारी’ अशी कितीतरी नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीस पडत गेली. या प्रवासात अनेक सुहृद भेटले, नाटकाचे-आयुष्याचे नवे नवे आयाम उलगडत गेले.

मी आजवर भरपूर भटकंती केली, निरनिराळी पुस्तकं वाचली, माणसांना भेटले – त्यांचं अंतरंग जाणून घेण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला. या साऱ्या अनुभवांचं जे संचित होतं तेच नाटकासाठीची शिदोरी होत गेलं. अप्पांसह ऑस्ट्रेलियाला असताना ठेवली गेलेली बडदास्त असो वा पुण्यातलं साधं आयुष्य, इथल्या एका प्रतिष्ठित कुटुंबाचा भाग असल्याची ओळख असो वा परदेशातही रुजलेली माझी मुळं.. अगदी पदोपदी हा विरोधाभास माझ्या अनुभवास येत गेला. कदाचित त्यामुळेच तो मांडण्याची, विविध अंगांनी सामाजिक चौकटींना – विषयांना भिडण्याची आंतरिक प्रेरणा माझ्यात सदैव जागृत राहिली. त्या प्रेरणेने कधी मालिका, माहितीपट तर कधी चित्रपटाची वाट धरली. मात्र या माध्यमांची वेगळी बलस्थानं असली तरी नाटकाइतकी ‘जिवंत’ मैत्री त्यांच्याशी होऊ शकत नाही हेच खरं. ‘तुम्ही किती पाण्यात आहात’ हे स्वच्छपणे दाखवणारं, मनमोकळी दाद आणि परखड टीका दोन्ही गाठीला बांधणारं, दर प्रयोगाला नव्याने रसिकांना अनुभूतीच्या पातळीवर पोहोचवणारं नाटक; म्हणूनच माझा सवंगडी आहे. त्याच्यासह मला पात्रांचा एक नवा खेळ मांडता येतो, प्रयोग करून पाहता येतात आणि दरवेळी रसनिष्पत्तीचा जिवंत स्पर्श अनुभवता येतो.

हेही वाचा >>> नाटयरंग : एक गुंतेदार, लांबलचक माइंड गेम

‘इवलेसे रोप’ हे मी लेखन-दिग्दर्शन केलेलं नवीन नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे.

मंगेश कदम – लीना भागवत यांच्यासारखे, आपल्या पात्राला न्याय देणारे समर्थ कलाकार सोबतीला असल्यामुळे हा प्रवास अधिकच आनंदाचा झाला आहे. ‘इवलेसे रोप’ ही एका मुरलेल्या नात्याची गोष्ट आहे. या जोडप्याला एकमेकांशीच नाही तर जगण्याशी बांधून ठेवणारा दुवा म्हणजे त्यांचं नातं आणि एक इवलंसं रोप! हे जोडपं – माई- बापू, ही अगदी आपल्या आजूबाजूला दिसणारी माणसं आहेत. अगदी लहानपणापासून कुठे कुठे हे माई-अण्णांचे अंश मी पाहिले, वेचले आणि आता तुमच्या भेटीला घेऊन येत आहे. तुमच्या भवतालातीलच एक इवलीशी गोष्ट सांगतो आहोत, या नाटकाने तुम्हाला काहीतरी देऊन जावं असा आमचा प्रयत्न आहे असं म्हणेन.

हल्ली ‘तुम्ही इतक्या वर्षांनी रंगभूमीवर येताय’ वगैरे लोक मला म्हणत असतात. पण मी कुठे दूर गेले होते, दुरावले होते असं मला वाटतच नाही. नाटकाशी जोडलेपण हे केवळ लेखन-दिग्दर्शनातून, रंगमंचावर येऊनच दिसून येतं असं नाही ना! नाटकाचा भाग होता येणं हे मला महत्त्वाचं वाटतं. मग ते विद्यार्थी म्हणून असो, साधा बघ्या म्हणून असो वा कोणी जाणकार-मार्गदर्शक म्हणून असो! रूप असं बदलत राहिलं तरी त्यातलं मैत्र हे तसंच राहतं. इतक्या दिग्गजांच्या साक्षीने, इतक्या वर्षांचा इतिहास असलेलं नाटक असंच अवचितपणे माझ्या आयुष्यात आलं आणि जन्मभराचा सुहृद होऊन गेलं! लहानपणी कधीतरी रुजलेल्या या नाटयप्रेमाच्या बीजाची निगराणी करून, त्याला तुमच्या प्रेमाचं-सद्भावनांचं खत-पाणी घालून, आता त्याचं रोपटं छान बहरलं आहे. इतकी वर्ष झाली तरी प्रयोग म्हटल्यावर दडपण, आतुरता, धडधडणं हे सगळं जाणवतंच. हाच तो नाटकातला ताजेपणा! मला आणि या रोपटयालाही हवा-हवासा वाटणारा!

शब्दांकन मुक्ता बाम