अनेकदा कामाची चांगल्या संधी ही दमदार अभिनेत्यांपेक्षा विशिष्ट वर्गातील लोकांना दिली जाते आणि भारतात हे मोठ्या प्रमाणावर होतं, असं विधान अभिनेता सैफ अली खानने केलं आहे. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर हा वाद सुरू झाला. फिल्मी कुटुंबातून पुढे आलेल्या अनेक कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने घराणेशाहीवर भाष्य केलं.

फिल्मी कुटुंबातून येऊनसुद्धा सैफ बॉलिवूडमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरला. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओमकारा’ या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका विशेष गाजली. ‘लंगडा त्यागी’ या त्याच्या भूमिकेवर प्रशंसेचा वर्षाव झाला होता. सेटवर सैफला ‘खान साहब’ म्हणून संबोधित करण्यात येतं. याबद्दल तो मुलाखतीत पुढे म्हणाला, “मी व्यक्ती म्हणून जसा आहे आणि ज्या प्रकारच्या भूमिका साकारल्या, त्याचा इतरांवर खूप प्रभाव पडतो. याशिवाय विशेषाधिकार हा सुद्धा वेगळा मुद्दा आहे. अनेकजण कठीण मार्गाने पुढे येतात तर काही जण सोप्या मार्गाने पुढे येतात. एनएसडी आणि फिल्म इन्स्टीट्यूटमधून प्रतिभेच्या जोरावर पुढे येतात तर आमच्यासारखे काही जण आईवडिलांमुळे मिळालेल्या विशेषाधिकारामुळे पुढे येतात.”

आणखी वाचा : “माझ्याशी पंगा घेतलास तर..”; सोनू निगमचा भूषण कुमारला इशारा

याचवेळी त्याने बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. “अनेकदा चांगल्या अभिनेत्यांना संधी मिळत नाही. कधी कधी ती चांगली संधी ही विशेष अधिकार असलेल्या लोकांना मिळते. भारतात हे असं अनेकदा घडतं”, असं तो म्हणाला.

बॉलिवूडच्या घराणेशाहीवरून सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी त्यांची मतं मांडली आहेत. काहींनी त्यांच्यासोबत घडलेले किस्सेसुद्धा सांगितले आहेत.