नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामधील प्रमुख भूमिका कोण करणार आहे, कथा काय असेल यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार या सिनेमाचे शुटिंगही सुरु झाले आहे.
२०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्यातल्या छोट्यात छोट्या सिनेमागृहात या सिनेमाचे चार चार शो चालवले गेले. या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका करणारे दोन्ही कलाकार रातोरात सेलिब्रिटी झाले. आर्चीची भूमिका करणारी रिंकू राजगुरु आणि परश्याची भूमिका करणाऱ्या आकाश ठोसरचा चेहरा घराघरांत ओळखला जाऊ लागला. या सिनेमाने तिकीटबारीवरही दणदणीत कमाई करुन मराठी सिनेमाच्या कमाईचे अनेक रेकॉर्डस मोडले. सिनेमासाठी रिंकुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर अनेक पुरस्कार सोहळ्यात सिनेमाने बाजी मारली. अशा या सैराटच्या दुसऱ्या भागाबद्दल सिनेमाचा पहिला भाग सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चा सुरु होती. अखेर या सिनेमाचा पुढचा भाग प्रदर्शित होणाऱ असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. या सिनेमाचे पुण्यामध्ये चित्रीकरण सुरु झाले आहे. पुण्यामध्ये चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात ‘सैराट २’ या शीर्षकाची नोंदणी झाल्याचेही वृत्त आहे.
काय असेल कथा
प्राथमिक माहितीनुसार आर्ची आणि परश्याचा मुलगा मोठा झाल्यानंतरची ही कथा असणार आहे. छाया कदम यांनी साकारलेली सुमन अक्काने ज्याप्रमाणे हैदराबादमध्ये पळून आलेल्या आर्ची आणि परश्याची काळजी घेतली त्याचप्रमाणे ती सुरुवातील त्यांच्या अनाथ मुलाचे संगोपन करताना दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर या मुलाचा ताबा त्याच्या मावशीकडे देण्यात येणार, असे या सिनेमाचे कथानक असेल. आर्ची आणि परश्याच्या मुलाच्या मावशीची भूमिका ‘गुलाबजाम’ फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्येच इतर माहिती समोर येईल.
सैराटची कथा जेथे संपली होती त्यावरून पुढील भागामध्ये आर्ची आणि परशाचा खून करणाऱ्या प्रिन्स मामाचा बदला त्यांचा मुलगा घेणार की सिनेमात आणखीन काही वेगळा संदेश दिला जाईल याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.