‘सैराट’…. वर्षभरापूर्वी हा शब्द कोणाला माहितही नव्हता. तसं बघायला गेलं तर आजही या शब्दाचा अर्थ फार कमी जणांना कळलाय. पण ‘सैराट’ म्हटलं डोळ्यासमोर येतो नागराज मंजुळे, आर्ची आणि परश्या. ‘फँड्री’नंतर नागराजच्या ‘सैराट’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला झिंगाट करून टाकलं. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे तर भलतेच भाव खावून गेले. आजच्या घडीला हे दोघंही जण कामाच्या बाबतीत स्थिरस्थावर झाले आहेत. रिंकूने ‘सैराट’चा रिमेक असलेल्या ‘मनसु मल्लिगे’मध्ये काम केलं. तर आकाश लवकरच महेश मांजरेकर यांच्या ‘एफयू’ चित्रपटात दिसेल. या दोन कलाकारांव्यतिरिक्तही ‘सैराट’8मध्ये आणखी काही नवखी कलाकार मंडळी होती. आता त्यांना कलाकार म्हणावं की नाही हा प्रश्नच आहे. कारण, ‘सैराट’नंतर ही मंडळी कलाक्षेत्रात कार्यरत नसून, वेगळाच व्यवसाय करण्याला प्राधान्य देताहेत. त्यापैकीच एक म्हणजे आर्चीच्या मामेभावाची भूमिका साकारणारा ‘मंग्या’ म्हणजेच धनंजय ननावरे.

mangya-dhananjay-nanaware

‘सैराट’मध्ये आर्ची-परश्यामधील नजरा नजरेच्या खेळाच्या आड येणारा पण नंतर त्यांच्या प्रेमाला खबरी बनून साथ देणाऱ्या मंग्याने चित्रपटात अगदी छोटीशीच पण लक्षात राहणारी भूमिका साकारली होती. मात्र, ‘ए मंग्या सोड त्याला..’, ‘मंग्या अयं व्हय बाहेर..’ यांसारखे आर्चीचे दादागिरीचे संवाद त्याच्यावरच चित्रीत झाल्याने तो आपल्या चांगलाच लक्षात राहतो. तर असा हा मंग्या म्हणजेच धनंजय सध्या उबर चालवून त्याचा उदरनिर्वाह करतोय.

वाचा : #SairatMania : महाराष्ट्रातनं थेट कर्नाटकात… ते बी एकटीच!

dhananjay-nanaware-02

मूळचा लोणी येथे राहणारा धनंजय आता पुण्यात त्याच्या चुलत्यांच्या घरी राहतो. पण, तुम्हाला माहितीये का…. आर्ची-परश्याच्या लग्नाचा बार उडण्याच्या बरोबर दोन दिवस आधीच या पठ्ठ्याच्या लग्नाचा बार उडालेला. येत्या २९ एप्रिलला ‘सैराट’च्या प्रदर्शनाला वर्ष पूर्ण होतंय. पण या आधीच २७ एप्रिलला धनंजय त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे. केवळ दहावी शिकलेला धनंजय सध्या उबर चालवून त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करतो. ‘सैराट’नंतर आपल्याला पुढे जाऊन कार्यक्रमात किंवा चित्रपटात काम मिळेल, या आशेवर न राहता त्याने स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वीच त्याने उबर चालविण्याचा निर्णय घेतला.

वाचा : #SairatMania : गोष्ट नागराज नावाच्या ब्रॅण्डची!

dhananjay-nanaware-and-wife

पुढे जाऊन जर अभिनय क्षेत्रात संधी मिळाली तर तिथेही काम करण्याचे धनंजयने ठरवले आहे. दरम्यान ‘सैराट’मुळे त्याचा चेहरा आता संपूर्ण महाराष्ट्रासमोर आला आहे. यामुळे टॅक्सी चालवताना कोणी तुला ओळखत नाही का? असा प्रश्न विचारल्यावर धनंजयचे उत्तर थक्क करणारे होते. ‘उबर टॅक्सीत बसणारी बहुतेक माणसं ही उच्चभ्रू असतात. त्यामुळे सहसा तसं कोणी विचारत नाही. पण, जर चुकून कोणी तू तो ‘सैराट’मधला मंग्या ना.. असं विचारलंच तर तुमचा गैरसमज झालाय,’ असं तो सांगतो. त्यामुळे जर तुम्ही कधी पुण्यात गेला आणि धनंजयच्या टॅक्सीत बसलात तर त्याला ‘तू मंग्या ना….’ असा प्रश्न विचारू नका. कारण त्यावर तुम्हाला एकच उत्तर मिळेल ‘तो मी नव्हेच…!’

#SairatMainia तुम्हाला कसा वाटतोय… तुमच्या काय आठवणी आहेत… ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा… loksatta.express@gmail.com  या ईमेल आयडीवर….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com