बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आज ५२ वर्षांचा झाला. नुकताच त्याचा ‘टायगर जिंदा है’ सिनेमा प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या पडद्यावर अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने १५० कोटींचा आकडा पार केला, तर छोट्या पडद्यावरही सलमानच गाजताना दिसत आहे. ‘बिग बॉस ११’ हा शो सध्या टीआरपीमध्ये इतर शोपेक्षा फार पुढे आहे. सध्या सलमानला सगळ्याच माध्यमांमार्फत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच हसत खेळत राहतो. पण, तरीही असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं देणं तो प्रकर्षाने टाळतो.
सलमान खान लग्न कधी करणार?
संपूर्ण देशातील प्रसारमाध्यमं बॉलिवूडमधील सर्वात कूल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न सातत्याने विचारत आहेत. पण या प्रश्नाचे उत्तर अजूनही सलमानने दिलेले नाही. ऐश्वर्या राय ते लुलिया वंतूरपर्यंत अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सची नावं त्याच्याशी जोडली गेली. पण या प्रेमप्रकरणाचे रुपांतर लग्नात मात्र झाले नाही. म्हणूनच सलमान य प्रश्नाचे उत्तर देणे प्रकर्षाने टाळतो.
सलमानला राग का येतो?
‘दबंग’ खानचा राग फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही वारंवार पाहायला मिळतो. अनेकदा छायाचित्रकार आणि प्रसारमाध्यमांच्या व्यक्तींवर हात उचलल्यानंतर सलमानची प्रतिमा मलिन झाली. चाहत्यांच्या मनात आपली प्रतिमा चांगलीच राहिली पाहिजे याची त्याला उपरती झाली आणि त्याने आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवायला सुरूवात केली. पण आजही जर कोणी त्याच्याशी वाद घातला तर सलमान त्याची दबंगगिरी दाखवतोच.
सलमानचा आवाज खराब कसा झाला?
काही आठवड्यांपूर्वीच बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये सलमानचा आवाज बिघडल्याचे पाहायला मिळाले. सलमानने तो पूर्ण एपिसोड बिघडलेल्या आवाजातच शूट केला. हवामानातील बदलामुळे त्याच्या आवाजात बदल झाल्याचे सांगण्यात येत होते. पण टायगर जिंदा है सिनेमाचे चित्रीकरण फार आधीच पूर्ण झाल्यामुळे हवामान बदलाचा प्रश्नच येत नाही.
काळवीटाला कोणी मारले?
काळवीट प्रकरणात आजही सलमानला कोर्टाच्या पायऱ्या घासाव्या लागत आहेत. अजूनही या प्रकरणाचा अंतिम निर्णय आलेला नाही. सलमानची या प्रकरणात निर्दोष मुक्तता होईल की नाही याचीच त्याच्या चाहत्यांना चिंता आहे. पण शेवटी काळवीटला कोणी मारले हा प्रश्न उपस्थित राहतोच.
रस्त्यावर झोपलेल्या माणसांना कोणी चिरडले?
काळवीट प्रकरणासह रस्त्यावर झोपलेल्या माणसांवर कोणी गाडी नेली या प्रश्नाचेही त्याने अजूनपर्यंत उत्तर दिलेले नाही. या प्रकरणाचा निकालही अजून लागायचा आहे. बिग बॉस ११ मधील स्पर्धक जुबैर खानने या प्रकरणाबद्दल बोलताना म्हटले होते की, सलमानने बीइंग ह्युमन या संस्थेची निर्मिती त्याची प्रतिमा सुधारण्यासाठीच केली आहे.
लुलियाशी ब्रेकअप का केले?
सध्या सलमानचे नाव लुलिया वंतूरशी जोडले जात आहे. खानच्या अनेक खासगी सोहळ्यात लुलिया आवर्जुन उपस्थित असते. या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. पण दोघांनी कधीही याला मंजूरी दिली नाही. काही दिवसांनी लुलिया तिच्या मायदेशी परतली. त्यानंतर दोघांमध्ये नेहमीच दुरावा दिसण्यात आला. त्या दोघांमध्ये नेमका कशामुळे दुरावा आला हे अजून कळू शकले नाही.
कतरिनासोबतचे संबंध सुधारत आहेत?
ऐश्वर्या रायनंतर सलमानचे नाव सर्वात जास्त कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडले गेले असेल तर ती म्हणजे कतरिना कैफ. या दोघांना एकत्र पाहण्याची अनेकांची इच्छा आहे. असे म्हटले जाते की, सलमानचा हात सोडून कतरिनाने रणबीर कपूरसोबत जाणे पसंत केले होते. पण रणबीर-कतरिनाचे नातेही फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा सलमान-कतरिनामध्ये जवळीक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा ही हीट जोडी कायमस्वरुपी जवळ येईल का या प्रश्नाचे उत्तरही त्याने द्यावे अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.