सलमान खान आणि जुबैर खान यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. जुबैर- सलमानच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता एक नवे प्रकरण समोर आले. काही दिवसांपूर्वी सलमानचा अंगरक्षक शेराने बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला होता. शबनम या महिलेने शेराने आपल्याला बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप केला होता.
शबनमच्या या आरोपावर आता शेराने आपली बाजू मांडली आहे. ‘मी या महिलेला ओळखत नाही. ती असे का बोलली, याचे कारण मला माहिती नाही. ही महिला ज्या मोबाईल नंबरवरून फोन आल्याचा दावा करत आहे तो नंबरही माझा नाही, तसेच रेकॉर्डिंमधील आवाजही माझा नाही. मी त्या महिलेला कधीही भेटलो नाही आणि मी तिच्याशी कधीही बोललो नाही. तिने केलेले आरोप निरर्थक आहेत, असे शेराने सांगितले.
२० ऑक्टोबरला मुंबईतील खार पोलीस ठाण्यात शबनमने तक्रार नोंदवली होती. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शबनमला धमकीचा फोन आला होता. यावेळी संबंधित व्यक्तीने आपण शेरा बोलत असल्याचे सांगितले. फोनवर जुबैर आणि सलमानच्या वादावर पडदा टाकण्यासाठी मध्यस्थी करण्यास तिला सांगण्यात आले. यासाठी नकार दिला तर सामूहिक बलात्कार करू, अशी धमकी शेराने दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले होते. यानंतर शेराविरोधात भारतीय दंडविधान कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.