पॉपस्टार जस्टिन बिबर याच्या मुंबईतील कॉन्सर्टची सध्या देशभरात प्रचंड चर्चा रंगली आहे. ‘पर्पज वर्ल्ड टूर’ अंतर्गत १० मे रोजी जस्टिन नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार आहे. या कार्यक्रमासाठी जस्टिन बिबरने केलेल्या मागण्या आणि ‘ईएमआय’वर उपलब्ध असलेल्या तिकीटाचे दर अशा अनेक रंजक गोष्टी सध्या कानावर पडत आहेत. या रंजक चर्चेत आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. या कार्यक्रमादरम्यान जस्टिनच्या सुरक्षेची जबाबदारी सलमान खानचा खास अंगरक्षक शेरा याच्याकडे असेल. शेराने यापूर्वी विल स्मिथ, जॅकी चॅन, केआनू रिव्हेस, पॅरिस हिल्टन, शॅगी, पीटर आंद्रे, डायना किंग , व्हिटफिल्ड या आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या कलाकारांच्या सुरक्षेची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती. बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षाव्यवस्थेची सूत्रे हाताळण्याचा अनुभव असल्यामुळे शेराकडे ही कामगिरी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे.

जस्टिन बिबरसारख्या कलाकाराच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या खांद्यावर सोपवण्यात आल्याबद्दल शेराने आनंद व्यक्त केला आहे. हा माझ्यासाठी सन्मान आहे. माझ्या कामाची संपूर्ण पडताळणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा एजंट्सकडून माझी निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय कलाकार संघटनेकडून समंथा टोझवोलोझ यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत शेराची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शेराची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीनंतर जस्टिनच्या सुरक्षेची जबाबादीर शेराकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेरा त्याच्या कामात सर्वोत्कृष्ट आहे. त्याची प्रसंगावधानता वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे त्याला भेटताक्षणी तो जस्टिनच्या सुरक्षेसाठी योग्य व्यक्ती असल्याची जाणीव झाल्याचे समंथा टोझवोलोझ यांनी सांगितले. दरम्यान, शेराने आयोजकांनी जस्टिनच्या सुरक्षेसाठी आखलेल्या योजनेचे कौतुक केले आहे. जस्टिनच्या सुरक्षेसाठी इतकी अभेद्य आणि सूक्ष्म पद्धतीने आखलेली योजना पाहून मी प्रभावित झालो आहे. ही माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक कामगिरी असेल, असेही शेराने म्हटले आहे.

शेरा मागील१८ वर्षापासून सलमानचा अंगरक्षक म्हणून कार्यरत आहे. तब्बल अठरा वर्षांपासून सलमानसोबत सावलीप्रमाणे संरक्षण देणाऱ्या गुरपीतला (शेरा) सलमान आपल्या परिवारातील एक सदस्यच मानतो. सलमान कोणत्याही ठिकाणी जाणार असेल त्यापूर्वी एक दिवस अगोदर शेरा त्या जागेची पाहणी करतो. यासाठी त्याने बऱ्याचदा चार ते पाच किलोमीटरचा परिसर पायी पालथा घातला आहे.