बॉलिवूडमध्ये सध्या नव्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटांनाही साजेसं नाव चित्रपटाच्या टीमकडून देण्यात येत असतं. मात्र अनेक वेळा चित्रपटांच्या नावावरुन  वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असाच वाद सलमान खानच्या निर्मितीअंतर्गत तयार होणाऱ्या ‘लवरात्री’ या चित्रपटावरुन झाला. अनेक हिंदू संघटनांनी या चित्रपटाचा निषेध केल्यानंतर सलमानने या चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या नावावरुनही गदारोळ झाला होता. या वादानंतर सलमान खानचा ‘लवरात्री’ हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या नावामध्ये हिंदू सणाच्या उल्लेख करण्यात आल्यामुळे काही हिंदू संघटनांनी या चित्रपटाचा निषेध केला. त्याबरोबरच काही ठिकाणी चित्रपटाचे पोस्टर जाळण्यात आले. हा प्रकार पाहून सलमानने चित्रपटाच्या नावात बदल केल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

आता सलमानच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘लवरात्री’ नसून ‘लवयात्री’ असं असणार आहे. चित्रपटाच्या या नव्या नावाचा पोस्टर सलमानने मंगळवारी रात्री उशीरा ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.  काही दिवसापूर्वी मुझफ्फरपूर येथील न्यायालयाने सलमान खान विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळेच चित्रपटाच्या अडचणी वाढू नयेत यासाठी चित्रपटाच्या टीमकडून नावात फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटातून सलमानचा मेहुणा आयुष शर्मा पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan changes title film loveratri to loveyatri to avoid controversies
First published on: 19-09-2018 at 09:50 IST