महामार्ग आणि शहरातील रस्त्यांवर मोटारसायकल अतिवेगाने चालवण्याविरोधात सुपरस्टार सलमान खानने तरुणांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मोटारसायकलींची स्पर्धा केवळ रेसिंग ट्रॅकवरच केली पाहिजे, असे सलमानने म्हटले आहे. जागतिक पर्यावरण दिनी बॅटरीवर चालणाऱ्या सायकलच्या अनावरण कार्यक्रमात सलमानने तरुणांसाठी हा संदेश दिला.
‘तरुणांसाठी आणि इतरांसाठीही सायकल चालवणे योग्य आहे. मात्र मोटारसायकल धोकादायक आहे. आम्ही फिल्म सिटीमध्ये जरी शूटिंग करत असलो तरी हायवेवर लोकांना बेदरकारपणे वाहन चालवताना मी पाहिले आहे.’ असे सलमान यावेळी म्हणाला. ‘वांद्रे रेक्लमेशन येथे झालेल्या स्पर्धेत मी माझ्या एका मित्राला गमावले आहे. त्यामुळे रस्त्यांवर होणाऱ्या मोटारसायकलींच्या अशा स्पर्धांविरोधात मी आहे.’ असेही त्याने सांगितले.
वाचा : …म्हणून त्या वेळी नर्गिससमोर चकार शब्दही बोलू शकले नव्हते सुनील दत्त
सायकल चालवण्याचा मोह खुद्द सलमानलाच आवरता आला नाही. सायकल लाँच सोहळ्याच्या वेळी सलमान आणि सोहेल खान दोघेही गॅलेक्सी अपार्टमेंटपासून मेहबूब स्टुडिओपर्यंत सायकल चालवतच आले होते. ‘मैने प्यार किया’ चित्रपट असो किंवा ‘किक’ आणि आगामी ‘ट्युबलाईट’ चित्रपटातही सुरूवातीपासूनच ऑनस्क्रीन सायकल चालवण्याबाबत उत्सुकता असल्याचे सलमानने यावेळी सांगितले. सलमान खानचा नवा चित्रपट ‘ट्युबलाईट’ २३ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.