नुकतेच कतरिना कैफने ‘वोग’ मासिकासाठी एक हॉट फोटोशूट केले. या फोटोशूटमधील काही फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केले आहेत. कतरिनाने हे फोटो शेअर करत त्याला आकर्षक कॅप्शनही दिले आहेत. कतरिनाच्या मादक अदांचे तर सारेच चाहते आहेत. कतरिनासोबतच सलमान खाननेही या मासिकासाठी खास फोटोशूट केले.

‘वोग’ मासिकाच्या कव्हर फोटोवर या दोघांमधील केमिस्ट्री चांगलीच दिसून येते. सलमानने याआधीच ‘टायगर जिंदा है’ सिनेमात कतरिनासोबत प्रणयदृश्य देण्यास नकार दिला होता. पण या फोटोमध्ये मात्र त्यांची केमस्ट्री साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या मासिकाच्या कव्हरवर सलमान आणि कतरिना दिसत आहेत. या दोघांनी जशी पोझ दिली आहे, तशीच काहीशी पोझ गेल्यावर्षी रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमादरम्यान दिली होती. तसेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनेही अशाच पद्धतीची पोझ याआधी दिली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एखादी गोष्ट कॉपी करण्याची सवय अजूनही गेलेली नाही हेच दिसून येते.

या दोघांच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर अली अब्बास जफर दिग्दर्शित सलमान आणि कतरिनाचा ‘टायगर जिंदा है’ सिनेमा २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत या सिनेमाची दोन गाणी आणि एक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘एक था टायगर’ सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे. सिनेमात सलमान आणि कतरिना एका दहशतवादी संघटनेशी लढताना दिसत आहेत. या संघटनेने २२ भारतीय परिचारिकांचे अपहरण केलेले असते. सलमानला या २२ परिचारिकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून वाचवायचे असते. यात या दोघांना यश मिळणार की नाही याचे उत्तर तर २२ डिसेंबरलाच मिळेल.