ऑक्टोबर महिन्यापासून सलमान खानचा शो ‘बिग बॉस’च्या बहुप्रतिक्षित ११ व्या पर्वाला सुरूवात होणार आहे. ‘बिग बॉस’चे कट्टर चाहते या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या शोचा पहिला टास्क काय असणार आहे याचा खुलासा झाला. ‘बॉलिवूड लाईफ’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, यावेळी हा शो अधिक रंजक करण्यासाठी अनेक सिक्रेट टास्क देण्यात येणार असून प्रेमसंबंधही दाखवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
…म्हणून सलमानची नजर कतरिनावरच खिळली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरातला पहिलाच टास्क फार रंजक असणार आहे. या टास्कमध्ये सेलिब्रिटींना शेजाऱ्यांवर नजर ठेवायची आहे. घरात राहणाऱ्यांना एकमेकांकडून माहिती मिळवून ती ‘बिग बॉस’ला द्यायची आहे. सर्वात जास्त सिक्रेट माहिती गोळा करणारे सेलिब्रिटी आणि शेजारी जिंकणार आहेत. या पर्वाची थीम ‘पडोसी’ आहे. ‘बिग बॉस’च्या प्रोमोमधूनच या थीमची घोषणा करण्यात आली होती.
याशिवाय ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच उघडपणे प्रेमप्रकरण होताना पाहता येईल. घरातील स्पर्धकांना सिक्रेट डेटिंग करण्याचे टास्क देण्यात येणार आहे. जोडीला चोरुन एकमेकांना डेट करत असल्याचे दाखवावे लागणार आहे. एवढेच नाही तर त्याची डेटिंग जर शेजाऱ्यांनी पकडली तर त्यांना शिक्षाही दिली जाणार. जर शेजारी त्या जोडप्याला ओळखू शकले नाही तर सेलिब्रिटी जिंकतील.
वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’चे यावेळेचे घर हे आधीपेक्षाही मोठे असणार आहे. सेलिब्रिटी आणि सामान्य स्पर्धक एकत्र घरात राहणार असले तरी घराचे दोन भाग करण्यात येणार आहेत. प्रतेयक ग्रुपला सुरक्षित राहण्यासाठी वेगवेगळे टास्क करावे लागणार आहेत. टास्क पूर्ण करणाऱ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येतील. काही दिवसांपूर्वी या शोचा तिसरा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये अभिनेत्री मॉनी रॉय ही सलमानची शेजारीण दाखवण्यात आली होती. या रिअॅलिटी शोला अधिक रंजक करण्यासाठी यात अनेक मोठ मोठे स्टार्स सहभागी होणार असल्याचे म्हटले जात असून, निकितन धीर, पर्ल पुरी, नीति टेलर, अबरार जहूर या कलाकारांचा समावेश होऊ शकतो.