‘मेरे बारे में इतना मत सोचना. दिल मे आता हूँ..समझ में नहीं’ हा सलमान खानचा आगामी ‘किक’ चित्रपटातील सध्या गाजणारा संवाद. हा संवाद पुन्हा एकदा सलमानने म्हटला आहे. पण, यावेळी पहिल्यांदाच त्याने हा संवाद बालगोपाळांचा देशी सुपरहिरो ‘छोटा भीम’साठी म्हटला आहे. ‘किक’च्या प्रसिध्दीच्या निमित्ताने का होईना मोठय़ा पडद्यावरचा हिरो सलमान आणि छोटय़ा पडद्यावरचा बालगोपाळांचा हिरो छोटा भीम एकत्र विशेष भागात आपली अ‍ॅक्शन दाखवणार आहेत.
‘पोगो’ वाहिनीवर ‘भीम और सलमान की किक’ नावाचा ९० मिनिटांचा विशेष भाग दाखवला जाणार आहे. एरव्ही सलमान खान आपल्या चित्रपटासाठी टीव्हीवरच्या वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोजना हजेरी लावतो. मात्र, इतर कोणत्याही मालिकांच्या सेटवर जायची किंवा कुठल्याही काल्पनिक मालिकांमध्ये विशेष भाग करण्याची त्याची तयारी नसते. पहिल्यांदाच सलमानने ‘पोगो’ वाहिनीवर एका कार्टुन व्यक्तिरेखेसोबत विशेष भाग करण्याची तयारी दाखवली आणि अगदी आवडीने तो भाग त्याने पूर्ण केला, असे सूत्रांनी सांगितले. खुद्द सलमाननेही ‘छोटा भीम’ची लोकप्रियता कबूल केली आहे. त्याच्या दिल मै आता हूँ. समझमें नही. याच संवादाचा आधार घेत ‘लेकिन छोटा भीम तो दिल मे भी आता है और समझ में भी..’ असे म्हणत त्याने या कार्टुन व्यक्तिरेखेचे कौतुक केले आहे.
सलमानची गणना ही नेहमी पडद्यावरचा देशी हिरो म्हणून होते. ‘किक’मध्येही त्याने सुपरहिरोची भूमिका केली आहे. मात्र तीही देशी थाटातच. त्यामुळे कित्येकदा सलमान आणि छोटा भीमची तुलना केली जाते. हीच गोष्ट लक्षात घेऊन या दोघांना एकत्र आणणाऱ्या भागाची निर्मिती करण्यात आली असल्याचे वाहिनीच्या सूत्रांनी सांगितले.
२७ जुलैला दुपारी १२ वाजता ‘भीम और सलमान की किक’ हा भाग पोगोवर प्रसारित केला जाणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी बॉलिवूडने कार्टून वाहिन्यांवर प्रवेश केला आहे. याआधी ‘क्रिश’च्या प्रसिध्दीसाठी ‘किड क्रिश’ नावाची अ‍ॅनिमेटेड मालिका दाखवण्यात आली होती. मात्र, त्यात ह्रतिक रोशनने सहभाग घेतला नव्हता. यावेळी सलमान खरोखरच छोटा भीमबरोबर खलनायकाची छुट्टी करताना दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan teams up with chhota bheem
First published on: 25-07-2014 at 02:56 IST