गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर #BottleCapChallengeची क्रेझ पाहायला मिळत आहे. अगदी सर्व सामान्यांपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनाच या चॅलेंजने वेड लावलं आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही हे चॅलेंज स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे. यात काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानने हे चॅलेंज स्वीकारलं आणि एका वेगळ्या पद्धतीने ते ट्राय केलं. मात्र सलमानने केलेल्या या नव्या पद्धतीने त्याला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं आहे.

‘बॉटल कॅप चॅलेंज’मध्ये बाटलीवरील झाकण बाटलीवरुन खालती पाडायचं असतं. मात्र हे करत असताना बाटली खाली पडू किंवा हलू द्यायची नसते. हे चॅलेंज अनेकांनी एक्सेप्ट केल्यानंतर भाईजाननेही ट्राय केलं. यावेळी त्याने चॅलेंज पूर्ण करत असताना एक महत्वाचा संदेश दिला.

सलमानने बाटलीवरील झाकण पायाने न काढता मजेशीर अंदाजात फूंकर मारून हे झाकण पाडलं. यावेळी त्याने साऱ्यांना पाणी वाचवण्याचा संदेश दिला. मात्र त्याची ही पद्धत नेटकऱ्यांना पटलेली दिसत नाही. नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. अनेकांनी त्याला ‘काळवीटाला देखील असंच वाचवता आलं असतं’, असं म्हटलं आहे. तर काहींनी ‘आता तू म्हातारा झाला आहेस’, असं म्हणतं त्याला त्याच्या वयाची जाणीव करुन दिली आहे.

काही नेटकऱ्यांनी तर त्याच्या या चॅलेंजची तुलना त्याच्या चित्रपटांसोबत केली आहे. त्यासोबतच या वयात असं काही करु नये, असंही म्हटलं आहे. यापूर्वी बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार, सिद्धार्थ चतुर्वेदी, टायगर श्रॉफ, कुणाल खेमू, अभिनेत्री सुष्मिता सेनसारख्या इतर कलाकारांनी ‘बॉटल कॅप चॅलेंज’ स्वीकारून व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे चॅलेंज स्वीकारण्यात बॉलिवूड कलाकारांसह मराठी कलाकारही मागे नाहीत. सिद्धार्थ चांदेकर, स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांनीदेखील अनोख्या ढंगात हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.