संदीप कुलकर्णी आणि पल्लवी सुभाष ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली ती झी मराठीवरच्या ‘गुंतता हृदय हे’ या मालिकेत. या मालिकेत मृणाल आणि संदीप पुन्हा एकत्र आले होते. पण, मृणालबरोबरच पल्लवीने साकारलेली संदीपची प्रेयसीही लोकांना तितकीच भावली. आता संदीप आणि पल्लवी ‘प्रेमसूत्र’ या चित्रपटात एकत्र आले आहेत. ‘प्रेमसूत्र’ या चित्रपटातून आजच्या तरुणाईच्या प्रेमातला आणखी एक लोच्या रंगवला आहे.
करिअर की प्रेम, कशाला कधी प्राधान्य द्यायचे या घोळात सापडलेल्या प्रेमीजनांसाठीचे प्रेमसूत्र या चित्रपटात असणार आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात संदीपने शहरी वातावरणात वाढलेल्या आणि कॉर्पोरेट करिअरमागे धावणाऱ्या तरुणाची भूमिका केली आहे, तर पल्लवीने गोव्यातल्या मनमोकळ्या वातावरणात वाढलेल्या सानिया या कॅथलिक तरुणीची भूमिका केली आहे.
सानियाच्या लग्नाबद्दलच्या कल्पना वेगळ्या असतात. तिचा मोकळा स्वभाव आणि प्रेमाविषयाचे स्पष्ट विचार ऐकून संदीप तिच्याकडे आकर्षित होतो. पण ते दोघेही प्रेमाच्या बंधनात अडकतात का, आनंद आणि सानियाच्या या नात्याचे काय होते, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.
संदीप आणि पल्लवीबरोबर लोकेश गुप्ते, श्रुती मराठे, इला भाटे, प्रसाद पंडित यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. छोटय़ा पडद्यावर भावलेली संदीप आणि पल्लवीची जोडी मोठय़ा पडद्यावरही लोकांना तितकीच आवडेल का, या प्रश्नाचे उत्तरही ‘प्रेमसूत्र’ प्रदर्शित झाल्यावर मिळेल.