प्रेक्षकांना रडवणे सोपे असते; पण हसवणे खूपच कठीण आहे. आपल्या दिलखुलास अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद हसविण्याचे काम संदीप पाठक या अभिनेत्याने सातत्याने लिलया केले आहे. आपल्या अभिनयाची छाप पाडत नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात त्यांचा सफाईदार वावर आहे. असा हा हरहुन्नरी अभिनेता संदीप पाठक प्रथमच ‘झी टॅाकीज’च्या माध्यमातून एका नव्या दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘झी टॅाकीज’ने आजवर अनेक दर्जेदार व नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना दिली आहे. याच धर्तीवर ‘तथास्तु’ या मराठीतल्या पहिल्या सायलेंट थ्रिलर चित्रपटाची निर्मिती करीत वेगळा प्रयत्न करण्याचे धाडस ‘झी टॅाकीज’ने केलं आहे. ‘झी टॅाकीज’ व ‘फिल्म पॉझिटीव्ही’ यांनी एकत्रित या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘तथास्तु’ चित्रपट शनिवार ३ डिसेंबर व रविवार ४ डिसेंबरला रात्री १०.०० वा. ‘झी टॅाकीज’वर प्रसारीत करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तथास्तु’ हा सायलेंट थ्रिलर चित्रपट असल्याने यात कोणताही शब्द- संवाद अथवा वाक्य नाही, कलाकारांचा आवाज नाही. त्यामुळे अर्थातच कलाकार म्हणून एक आव्हानात्मक भूमिका वाट्याला आल्याचे समाधान मिळाल्याचे मनोगत संदीप पाठकने यानिमित्ताने व्यक्त केले. मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच सायलेंट थ्रिलर चित्रपटाची ‘झी टॅाकीज’ने निर्मिती केली व त्याचा एक भाग असल्याचा आनंद देखील आपल्यासाठी तितकाच महत्त्वपूर्ण असल्याचे संदीपने आवर्जून सांगितले. संदीप या चित्रपटामध्ये एका विक्षिप्त व्यक्तीरेखेत दिसणार आहे; ‘तथास्तु’चे दिग्दर्शन साहिल अभय तांडेल या युवा दिग्दर्शकाने केले असून गौरव पोंक्षे यांनी छायादिग्दर्शन केलं आहे. ‘तथास्तु’ चित्रपटाची संकल्पना या दोघांची असून ‘झी टॅाकीज’ने ही कन्सेप्ट आवडल्यामुळे या नवख्या टीमला पाठिंबा देत चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस केलंय. संदीप पाठक यांच्यासोबत माधवी निमकरची देखील वेगळ्या शैलीतील भूमिका पहायला मिळणार आहे.

‘तथास्तु’ या मूकपटाची निर्मिती करून मनोरंजन विश्वात ‘झी टॅाकीज’ ही वाहिनी नवा ट्रेण्ड निर्माण करेल असा विश्वास संदीपने व्यक्त केला. भूतकाळातील अनेक गोष्टींचे परिणाम आपल्याला भविष्यकाळात भोगावे लागतात या कथानकावर ‘तथास्तु’ हा चित्रपट आधारित आहे. ‘झी टॅाकीज’वर शनिवार ३ डिसेंबर रात्री १०.०० वा. व रविवार ४ डिसेंबर रात्री १०.०० वा. या दोन दिवशी हा चित्रपट प्रक्षेपित केला जाणार आहे. मराठी सिनेमातल्या या वेगळ्या प्रयोगाचे रसिक निश्चितच स्वागत करतील असा विश्वास ‘झी टॅाकीज’ने यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandip pathak playing a weird character in his upcoming movie tathastu
First published on: 28-11-2016 at 16:40 IST