दिलीप ठाकूर
‘संजू’बद्दल एकिकडे उलटसुलट चर्चा सुरु असतानाच चित्रपटाने मात्र लोकप्रियता आणि गल्ला पेटीवर नवीन विक्रमांचा धडाकाच लावला आणि अशातच संजय दत्तच्या करियरमधील सर्वाधिक बहुचर्चित आणि वादग्रस्त देखील  ‘खलनायक’ (१९९३) चित्रपटाची आठवण येणे अत्यंत स्वाभाविक आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण निर्माता-दिग्दर्शक सुभाष घईने नाना पाटेकरला ‘नायक’ म्हणून घेऊन ‘खलनायक’ साकारण्याची तयारी सुरु केली होती. ‘परदेस’च्या निमित्त सुभाष घईच्या दीर्घ मुलाखतीचा योग आला असता अशा काही गोष्टीही माहित झाल्या. पण मग संजय दत्त कसा काय आला?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नानासोबतच्या तीन चार बैठकांमध्ये सुभाष घईच्या लक्षात आले की सेटवर काही वाद होऊ शकतात त्यापेक्षा आपण ‘नायक’च बदलूया. (तत्पूर्वीच अमिताभ बच्चनसोबतचा सुभाष घईचा ‘देवा’ एका चित्रीकरण सत्रातच बंद झाला होताच.) सुभाष घई मूळचा पटकथाकार! आता संजय दत्त ‘खलनायक’ साकारणार म्हटल्यावर तो अधिकच मसालेदार आणि मनोरंजक असायला हवा या दृष्टिने त्याने चित्रपटात काही बदल केले. राम केळकर व सचिन भौमिक हे सुभाष घईंचे हुकमी पटकथालेखक. मानवी मूल्ये, नाती, योगायोग आणि फिल्मी गोष्टी याचा मेळ ते छान जमवत आणि घई उच्च निर्मिती मूल्ये, सुपर हिट गीत (आनंद बक्षी), संगीत (लक्ष्मीकांत-प्यारेलाल ) व नृत्य (सरोज खान) त्याचप्रमाणे पडदाभर दृश्य सौंदर्य यातून आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात यश प्राप्त करणारा. आपल्या जवळपास प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर अथवा बाह्यचित्रीकरण स्थळावर आम्हा सिनेपत्रकारांना ते बोलवणारच.

‘खलनायक’ निर्मितीवस्थेत असतानाच संजू व माधुरी दीक्षितच्या मैत्रीच्या खमंग गोष्टी गॉसिप्स मॅगझिनमधून रंगू लागल्या. अशातच निर्माता-दिग्दर्शक सावनकुमार टाक यांनी याच चित्रपटाशी स्पर्धा करण्यासाठी ‘खलनायिका’ चित्रपट निर्माण करण्याचे पाऊल टाकत बातम्यांना संधी दिली. अनू अग्रवाल शीर्षक भूमिकेत आणि जीतेंद्र व जयाप्रदा नायक-नायिका.

तर दुसरीकडे ‘खलनायक’ चित्रपट पूर्ण झाला आणि सुभाष घई स्टाईलमध्ये सर्वप्रथम त्याची गाणी प्रकाशित झाली. आणि ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावरून सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात वादळ निर्माण झाले. अबब! हे काय बोल आहेत का वगैरे वगैरे टीकेचा भडिमार सुरु झाला. इला अरुण एकदम चर्चेत आली. (‘खलनायिका ‘मध्ये चोली मे है तबाही तबाही…’ गाणे आले. ते वर्षा उसगावकारवर होते.)

त्यातच १२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी म्हणून संजय दत्तला अटक होताच त्याच्यावर ‘खलनायक’ असा शिक्का बसला. ही घटना व याच नावाचा चित्रपट हा खरं तर योगायोगच. पण चित्रपटाचे प्रदर्शन काही महिने पुढे ढकलणे स्वाभाविक होतेच. एकूणच सामाजिक वातावरण ‘खलनायक’ चित्रपटाविरोधात होते. ते निवळण्याची वाट पाहणे एवढेच घई व चित्रपटाचे वितरक यांच्या हाती होते. संजय दत्तच्या करियरमधील हा सर्वात महत्वपूर्ण चित्रपट होता. याच्या यशाने तो ‘सुपर स्टार’ बनेल असे चित्र होते. पण तो तर गंभीर गुन्ह्यासाठी गजाआड झालेला.

अखेर ऑगस्टच्या पहिल्या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. (‘ खलनायिका’देखिल त्याच बरोबर प्रदर्शित झाला.) ‘खलनायक’चे मुंबईत मुख्य चित्रपटगृह मेट्रो, तर आम्हा समिक्षकांसाठी राजकमल कलामंदिरच्या मिनी थिएटरमध्ये खेळ आयोजित केला. सुभाष घईचा मसाला पॅक चित्रपट म्हटल्यावर जे जे हवे ते खच्चून भरलय हे जाणवत होतेच पण सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ठरली ती, ‘चोली के पीछे’ गाण्यात कुठेही सवंगता- अश्लिलता-बिभत्सता नव्हती. माधुरी दीक्षितकडून ते शक्यच नव्हते. तिच्या धक-धक अदांमध्ये स्टाईल असते. ‘पालकी मे हो के सवार चली मे…’ गाणे श्रवणीय होते. ‘नायक नही खलनायक हू मै’ असा गाण्याचा दणका होताच.

चित्रपटात मॉ (राखी), भाऊ (जॅकी श्रॉफ), खलनायक सॉरी ‘व्हीलन’ (प्रमोद माऊथो) वगैरे वगैरे सगळेच घटक होते. अनुपम खेर, रम्या, ए. के. हनगल इत्यादी अनेक कलाकार होतेच. पण संजय दत्त ‘खलनायक’ का बनला? परिस्थिती  (अर्थात या चित्रपटातील), विविध स्तरावर वाईटच अनुभव येत गेल्याने त्याच्यातील माणूस मरत जातो.

‘खलनायक’ला चित्रपटप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळाला, तरी संजूच्या प्रतिमेवर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हा डाग कायम होताच . कारण चित्रपटातील भूमिका किंवा अभिनय आणि प्रत्यक्षातील कृत्य व शिक्षा हे वेगळे घटक होते अथवा आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt madhuri dixit khalnayak flashback
First published on: 06-07-2018 at 01:05 IST