scorecardresearch

संजय खापरे यांचे नवे नाटक ‘डोन्ट वरी हो जायेगा’

मराठी चित्रपट आणि नाटक क्षेत्रांत लीलया वावरत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता संजय खापरे यांचे नवे नाटक रंगभूमीवर येत आहे.

संजय खापरे यांचे नवे नाटक ‘डोन्ट वरी हो जायेगा’
संजय खापरे यांचे नवे नाटक ‘डोन्ट वरी हो जायेगा’

मराठी चित्रपट आणि नाटक क्षेत्रांत लीलया वावरत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता संजय खापरे यांचे नवे नाटक रंगभूमीवर येत आहे. ‘डोन्ट वरी हो जायेगा’ हाच कानमंत्र घेऊन रंगभूमीवर एक नाटक घेऊन ते सज्ज झाले आहेत. ‘दिशा’ निर्मित आणि ‘कलारंजना’ सादरकर्ते असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन संजय खापरे यांनी स्वत:च केले आहे. ‘डोन्ट वरी हो जाएगा’ या नाटकाचा प्रयोग १५ ऑगस्टला दुपारी ४.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली आणि १६ ऑगस्टला दुपारी ४.३० वा. गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. या नाटकाची निर्मिती प्रिया पाटील, नंदकिशोर पाटील आणि उदय साटम यांनी केली आहे. 

सकारात्मक भावना मनात आणली तर आपले काम सहज चांगले होऊ शकते, या मध्यवर्ती संकल्पनेवर ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या नाटकाचा विषय बेतला आहे. प्रत्येक खडतर परिस्थितीत स्वत:ला समजावत राहायचं, डोन्ट वरी हो जायेगा.. कारण एक छोटीशी आशाही जिंकण्याची पहिली पायरी असते. या नाटकाच्या दिग्दर्शनाची आणि अभिनयाची धुरा संजय खापरे यांनी सांभाळली आहे. मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या संजय यांच्यासोबत या नाटकात सुपर्णा श्याम, रोहित मोहिते आणि आसावरी ऐवळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका मी या नाटकात सांभाळली आहे. दिग्दर्शक म्हणून माझं हे दुसरं नाटक आहे. परिस्थितीपुढे हात न टेकता तिला सडेतोड उत्तर देतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो, हा कानमंत्र या नाटकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे संजय खापरे यांनी नाटकाबद्दल बोलताना सांगितले. आशय हलक्या-फुलक्या रीतीने मांडत मनोरंजनातून डोळय़ात अंजन घालणारं हे नाटक असून तणावमुक्त वाावरणात प्रेक्षक नाटकाचा आनंद घेऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या नाटकाची मूळ संकल्पना राहुल पिंगळे यांची असून लेखन रोहित मोहिते आणि रोहित कोतेकर यांनी केले आहे. नाटकाचे नेपथ्य महेश धालवलकर तर प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. गीत ललित युवराज तर संगीत मितेश चिंदरकर यांचे आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay khapare new play dont vari ho jayega marathi movies field drama ysh

ताज्या बातम्या