‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेमुळे नावारुपास आलेला टेलिव्हिजन अभिनेता गौतम रोडे याने त्याच्या रिलेशनशिपविषयी अखेर खुलासा केला आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री पंखुरी अवस्थीसोबत गौतम गेल्या बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होता. त्याने आपले हे नाते नेहमीच प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवले. पण, सरतेशेवटी त्याने या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’ला याविषयी माहिती देत गौतम म्हणाला, ‘हो, पंखुरी आणि मी नुकताच साखरपुडा केला आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या निर्णयानंतर आम्ही दोघेही फार आनंदात आहोत.’ याविषयी त्याने आणखी कोणतीच माहिती दिली नसल्यामुळे त्याच्या लग्नाविषयीची उत्सुकता कायम आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वीच गौतमने पंखुरीकडे त्याचे प्रेम व्यक्त केले होते. पंखुरी, ‘स्टार’ वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘क्या कसूर है अमला का?’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘सूर्यपूत्र कर्ण’ या मालिकेच्या सेटवर गौतमसोबत तिची ओळख झाली होती. कालांतराने त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण, बराच काळ त्यांनी हे नाते सर्वांपासून लपवून ठेवले. कुटुंबिय आणि काही खास मित्रमंडळी वगळता गौतम- पंखुरीच्या नात्याविषयी कोणालाही फारशी माहिती नव्हती. पण, आता त्यांच्या साखरपुड्याची माहिती समोर आल्यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा