मालिका आणि सिनेदिग्दर्शक म्हणून सतीश राजवाडे आपणा सर्वांना माहीत आहेत. त्यांच्या सर्व मालिका आणि चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. नुकताच ‘मुंबई पुणे मुंबई ३’ हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता सतीश राजवाडे काय करणार, कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. याचं उत्तर म्हणजे जवळपास १९ वर्षांनंतर सतीश राजवाडे रंगभूमीवर येणार आहेत.
‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकातून ते बऱ्याच वर्षांनंतर प्रेक्षकांसमोर येणार आहेत. याआधी त्यांनी ‘ऑल द बेस्ट’ या नाटकात काम केलं होतं. त्यानंतर मालिका आणि सिनेदिग्दर्शक म्हणून त्यांची गाडी सुसाट चालू राहिली.
Video : पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले’?
आल्फ्रेड हिचकॉक यांच्या कथेवर आधारीत ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री हे नवीन नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे. महाविद्यालयीन एकांकीकेपासूनच पुष्कर आणि सतीश एकमेकांना ओळखतात. म्हणूनच या नाटकासाठी पुष्करने स्वत:हून दिग्दर्शक विजय केंकरे यांना सतीश राजवाडे यांचं नाव सुचवलं. सतीश, पुष्करसोबतच या नाटकात अभिनेत्री श्वेता पेंडसे आणि अभिजीत केळकर हे दोघंही झळकणार आहेत. निलेश शिरवाईकर लिखित या नाटकाची निर्मिती निनाद करपे यांनी केली आहे.